मुंबई - एकीकडे न्यूयॉर्क, लंडन आणि शांघायच्या धर्तीवर मुंबईचा विकास करण्याचा ‘ध्यास’ आणि दुसरीकडे सायकलस्वारांसाठी सुरक्षित सायकल ट्रॅक नसल्याने त्यांच्या जिवाशी चाललेला खेळ असे गंभीर वास्तव ‘लोकमत’ चमूच्या पाहणीत समोर आले आहे. महामुंबईत सायकल चालविण्याची इच्छा आणि फिटनेसची ओढ असलेल्या नागरिकांना ट्रॅक तर सोडाच, फारशी जागाही उपलब्ध नाही. उलटपक्षी चुकीच्या नियोजनामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेले काही सायकल ट्रॅक उखडून फेकावे लागले आहेत तर काही ट्रॅकवर अतिक्रमणांचे ‘पार्किंग’ झाले आहे.
मुंबईतील बीकेसी भागात सायकल ट्रॅक उभारण्यासाठी प्रशासनाने तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले. मात्र, योग्य नियोजनाअभावी हा प्रकल्प सपशेल फसला. धक्कादायक बाब म्हणजे, हे अपयशी ट्रॅक तोडण्यासाठी पुन्हा २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जनतेचा ८५ कोटी रुपयांचा कर अशाप्रकारे पाण्यात गेला असून, या उधळपट्टीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सायकलस्वारांसाठी राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिका काही नियोजन करणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
हे आहे सायकलस्वारांपुढील दिव्य...लहान मुले व तरुणांमध्ये सायकल चालविण्याची आवड वाढत आहे. अनेक तरुण सायकल ग्रुपमधून राज्यभरात भटकंती करीत असतात. पण शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि हौशी सायकलस्वारांची संख्या अनेक अडचणींमुळे कमी होत आहे. दुचाकी वाहनांची संख्या व वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत सायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांसाठीच रस्ते अपुरे असून दुरुस्ती कामांमुळे महामुंबईत बहुतांश भागांमध्ये वाहतूक कोंडीचे चित्र आहे.
वाहनांच्या गर्दीतून माग काढताना सायकलस्वारांना दिव्य करावे लागते. अनेक देशांमध्ये कार्यालयात जाण्यासाठी आणि अन्य कामांसाठी बरेच जण सायकलींचा वापर करतात. मुंबईतही आवड आणि फिटनेस जपण्यासाठी सायकल वापरण्याकडे अनेकांचा कल आहे. महामुंबईत दुचाकी व चारचाकी वाहनांसाठीच पार्किंगची पुरेशी सुविधा नसल्याने सायकलींच्या पार्किंगचा विचारही केला जात नाही. रेल्वेस्थानकानजीक, वाहनतळांमध्ये सायकल पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था नसते. त्यामुळे सायकल वापरणे गैरसोयीचे होत आहे.
एमएमआरमधील शहरांत ट्रॅक कागदावरच
पामबीच मार्गावर नेरूळमध्ये ट्रॅक विकसित करण्याचा प्रयत्न झाला, पण जागा नसल्याने केवळ ‘पट्टे’ ओढून बोळवण केली. हा प्रयोग पूर्णपणे फसला असून सायकलस्वारांना मुख्य रस्त्यावर जीवावर उदार होऊन सायकल चालवावी लागत आहे. ठाणे : ठाण्यातील सायकल ट्रॅक म्हणजे आता ‘भाजीबाजार’ आणि ‘पार्किंग झोन’ झाले आहेत. फळविक्रेते, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि जॉगर्सनी हे ट्रॅक बळकावले असून, सायकलस्वारांना तिथे प्रवेश मिळणेही कठीण झाले आहे. कल्याण-डोंबिवली : कल्याणमध्ये श्रीनिवास तांदळे या सायकलपटूचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. स्वतंत्र ट्रॅक नसल्यामुळे सायकलस्वार वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या सावटाखाली वावरत आहेत.
Web Summary : Mumbai's cycle tracks are disappearing, endangering cyclists. Millions spent on tracks are wasted due to poor planning and encroachment. Cyclists face risks amidst traffic, lacking safe spaces and parking. Other cities' tracks are also misused, leaving cyclists vulnerable.
Web Summary : मुंबई में साइकिल ट्रैक गायब हो रहे हैं, जिससे साइकिल चालक खतरे में हैं। खराब योजना और अतिक्रमण के कारण ट्रैक पर खर्च किए गए करोड़ों रुपये बर्बाद हो गए। साइकिल चालकों को सुरक्षित स्थानों और पार्किंग की कमी के कारण यातायात में जोखिम का सामना करना पड़ता है। अन्य शहरों के ट्रैक का भी दुरुपयोग हो रहा है, जिससे साइकिल चालक असुरक्षित हैं।