लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:18 IST2026-04-19T10:17:30+5:302026-04-19T10:18:08+5:30

अक्षय्य तृतीया हा सण खान्देशात आखाजी म्हणून ओळखला जातो. हा सण सासुरवाशिणींच्या अधिक जिव्हाळ्याचा... माहेराची सय जागी करणारा आखाजी लोकलयींमधून आपल्याला भेटत असतो.

Akhaji: The Soul of Khandesh and the Melodious Bond of Daughters with their Mother’s Home | लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

दुर्गेश सोनार
सहायक संपादक 

चैत्र सरतो आणि वैशाखाच्या तळपत्या उन्हाने धरती करपू लागते. धुळीने माखलेल्या पायवाटा, आटलेल्या विहिरी, विरळ सावल्या... अशा दिवसांत आखाजी येतो आणि कोरड्या ऋतूलाही आनंदाचा ओलावा लाभतो. अक्षय्य तृतीया अर्थात खान्देशातला आखाजी हा नात्यांची वीण घट्ट करणारा सण. सासुरवाशिणींसाठी तर तो काळजात जपलेला दिवस. आखाजी जवळ आला की माहेरची ओढ उसळते आणि त्यातून जन्म घेतात आखाजीची अक्षय गाणी.

अहिराणी बोलीतील ही गाणी कुण्या कवीने लिहिलेल्या कविता नाहीत; जात्यावर दळताना, विहिरीवर पाणी शेंदताना, झोक्यावर झुलताना सहज ओठांवर आलेल्या कहाण्या आहेत. म्हणूनच त्यात कृत्रिमता नाही; तर जगण्यातून आलेला थेट तरल स्पर्श आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी यायला मिळते. दिवाळी घाईत निघून जाते; पण आखाजीला विसाव्याचे काही क्षण असतात. म्हणूनच त्यांच्या नजरा माहेरच्या वाटेकडे लागलेल्या असतात -

“आखाजी आली माय, धाडजो कोनी घेवा,
डोळाभर वाट पाहूं, उंबरठा टेकवा...”

या दोन ओळींत स्त्रीमनाची व्याकुळता दडलेली आहे. माहेर म्हणजे केवळ घर नव्हे; ती आपलेपणाची सावली असते.
आखाजीच्या गाण्यांत भाऊ-बहिणीच्या नात्याचा विलक्षण जिव्हाळा आहे. भाऊ म्हणजे माहेराचा चालता-बोलता दुवा - 

“भाऊ मन्हा येईल रं, धूळ उठी वाटे,
आखाजीच्या दिसी, जीव धडधडी छाते...”

माहेरच्या ओढीने ती भावाबरोबर निघते तेव्हा वैशाखाचे ऊन अंग भाजत असते, अशावेळी वाटेतील कन्हेरीची सावली तिला दिलासा देते.

“चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय, वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय, तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय, पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय, बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय, कन्हेरानं झाड...”

सणाला आमरस, पुरणपोळीचा बेत असतो. झाडांना झोके बांधले जातात. मैत्रिणी भेटतात, हास्याचे मोहोळ उठते आणि आपसूकच गाणे ओठांवर येते -

“आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं,
कैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वं...”

या गीतांत आनंदाचाही ताल आहे आणि श्रम विसरून जगण्याची मुक्तताही. अहिराणी बोलीचे माधुर्य या गीतांतून खुलते. “मन्हा”, “धाडजो”, “मायेर”, “दिसी” असे शब्द केवळ शब्द राहत नाहीत; ते संपूर्ण प्रदेशाची लज्जत घेऊन येतात. भाषा शब्दकोशात नसते, ती लोकांच्या जगण्यात असते, याचा प्रत्यय ही गाणी देतात. आखाजीची गाणी म्हणजे खान्देशातील स्त्रियांचे मौखिक आत्मचरित्रच. ज्यांना लिहिण्याची संधी नव्हती, त्यांनी गाण्यांतून व्यथा, प्रेम, स्मृती आणि आनंद जपून ठेवला. आखाजी दरवर्षी येतो, जातो; पण या गीतांत जपलेला माहेराचा ओलावा कायम अक्षय राहतो.

Web Title : अक्षय तृतीया: मातृभूमि के लिए शाश्वत प्रेम और लालसा के गीत।

Web Summary : खानदेश में अक्षय तृतीया रिश्तों को मजबूत करती है, खासकर विवाहित महिलाओं के लिए जो अपनी मातृभूमि के लिए तरसती हैं। अहीरानी गीत इस लालसा को दर्शाते हैं, प्रेम, यादें और खुशी व्यक्त करते हैं। ये मौखिक इतिहास 'माहेर' (मातृभूमि) के स्थायी सार को संरक्षित करते हैं।

Web Title : Akshaya Tritiya: Songs of enduring love and longing for maternal home.

Web Summary : Akshaya Tritiya in Khandesh strengthens bonds, especially for married women longing for their maternal home. Ahirani songs reflect this yearning, expressing love, memories, and joy. These oral histories preserve the enduring essence of 'maher' (maternal home).