धुळे : गुजरात राज्याच्या सूरत येथील शुकुल ग्रुप ऑफ कंपनीजने गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा आठ ते नऊ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून खान्देशातील चार हजार ४०० पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम तब्बल ७६ कोटी रुपये असून, त्यातील ५६ कोटी रुपये खान्देशातून गोळा केल्याची माहिती पोलिसांनी दिली तसेच या गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणुकीची रक्कम वाढणार असल्याची शक्यताही पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि आर्थिक गुन्हे शाखेने व्यक्त केली आहे.
सूरत येथील प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना शुकूल, धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल या चाैघांनी पूर्वनियोजित कट रचून शुकूल वेल्थ ॲडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाउंडर, डेली गेट अशा चार कंपन्यांची स्थापना केली. दोंडाईचा येथील आकाश मंगेश पाटील आणि मंगेश नारायण पाटील या बाप-बेट्याला हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीची जाहिरात सुरू केली.
या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा आठ ते नऊ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. सन २०१९ ते १३ सप्टेंबर २०२२ पर्यंत खान्देशात चार हजार ४०० पेक्षा अधिक नागरिक या आमिषाला बळी पडले. या नागरिकांनी ५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातील ठरल्याप्रमाणे परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार वाढत गेले.