जिल्ह्यात आजपासून मोफत धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:38 AM2021-05-07T04:38:02+5:302021-05-07T04:38:02+5:30

धुळे : गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप रेशन दुकानदारांनी गुरुवारी स्थगित केला असून, सणासुदीत मोफत धान्य वितरणाचा मार्ग मोकळा ...

Distribution of free foodgrains in the district from today | जिल्ह्यात आजपासून मोफत धान्याचे वितरण

जिल्ह्यात आजपासून मोफत धान्याचे वितरण

Next

धुळे : गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप रेशन दुकानदारांनी गुरुवारी स्थगित केला असून, सणासुदीत मोफत धान्य वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरासह जिल्ह्याच्या २५ टक्के दुकानांमध्ये धान्यसाठा पोहोचला आहे. ज्या दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे, त्या दुकानांमध्ये आजपासून मोफत धान्याचे वितरण सुरू होणार आहे. येत्या दोन-चार दिवसात सर्वच दुकानांमध्ये मोफत धान्याचे वितरण सुरु होईल.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी संतोष जैन यांनी सांगितले की, राज्य संघटनेने १ मेपासून संप पुकारला होता. ई-पाॅसवरील ग्राहकांचा अंगठा घेण्यास शासनाने स्थगिती दिली असली तरी रेशन दुकानदारांच्या विम्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. संपादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासनासोबत चर्चा सुरु आहे. कोरोनामुळे बिकट झालेल्या परिस्थितीत राज्यातील रेशन दुकानदारांचा विमा काढला तर आर्थिक भार सहन होणार नाही. सध्या कोरोना रुग्णांचा उपचार आणि लसीकरणावर शासनाचा सर्वाधिक निधी खर्च होत असल्याने संप मागे घ्यावा अशी विनंती शासनाने केली. तसेच रमजान ईद आणि अक्षय तृतीया या सणासुदीच्या काळात गरजूंचे धान्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी संघटनेने संप स्थगित केला आहे. येत्या एक-दोन दिवसात धान्याचे वितरण सुरू होईल, अशी माहिती संतोष जैन यांनी दिली.

दरम्यान, मोफत धान्य वितरणाची तयारी पुरवठा विभागाने केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील ९८१ दुकानांपैकी २५ टक्के दुकानांवर म्हणजे जवळपास २५० दुकानांवर धान्य पोहोचले आहे. इतरही दुकानांवर धान्य पोहोचविण्यासाठी पुरवठा साखळी कामाला लागली आहे. धान्य वितरणात हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोणाला किती धान्य मिळणार

मे महिन्यासाठी ७ हजार २ मेट्रिक टन गहू आणि ८ हजार ८६८ मेट्रिक टन तांदूळ इतक्या धान्याचे नियोजन आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रतिशिधापत्रिका २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळेल. प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना गेल्या वर्षाप्रमाणे प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळणार आहे. तसेच दुकानांमध्ये शिल्लक असलेली डाळ प्राधान्याने अंत्योदय लाभारर्थ्यांना आणि उर्वरित प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. हे सर्व धान्य मोफत मिळणार आहे.

जून महिन्यात अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळणार आहे. गहू २ रुपये किलो, भरडधान्य १ रुपये आणि तांदूळ ३ रुपये किलो मिळेल. तसेच १ किलो साखर २० रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. धान्याचा दर अंत्योदय योजनेप्रमाणेच असणार आहे. प्राधान्य कुटुंबांना साखर मिळणार नाही. जूनमध्ये गहू काही प्रमाणात कमी करून भरडधान्य देण्याचे नियोजित आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत जून महिन्यातदेखील अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.

Web Title: Distribution of free foodgrains in the district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.