शिरपूरला तरुणांसाठी आणखी एक लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:28+5:302021-05-11T04:38:28+5:30

शिरपूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे़ कोरोनापासून जनतेचे रक्षण व्हावे म्हणून शहरातील आर.सी. पटेल मेन ...

Another immunization center for youth in Shirpur | शिरपूरला तरुणांसाठी आणखी एक लसीकरण केंद्र

शिरपूरला तरुणांसाठी आणखी एक लसीकरण केंद्र

Next

शिरपूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे़ कोरोनापासून जनतेचे रक्षण व्हावे म्हणून शहरातील आर.सी. पटेल मेन बिल्डिंग येथे कोविड-१९ लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला़

लसीकरण मोहीम प्रभावी व गतिमान पद्धतीने व्हावी, रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या सहकार्याने व आरोग्य विभाग यांच्यावतीने नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत सोमवारपासून शहरातील आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे दुसऱ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ़नितु बत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

या लसीकरण केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्ग, नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यास कमी गर्दीत लोकांना लसीकरणाचा लाभ घेता येईल, या उद्देशाने पटेल परिवाराने इमारत उपलब्ध करून दिली आहे. शासनाला व प्रशासनाला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी अजून इमारतींची गरज भासल्यास आमदार अमिरशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे अजून इमारती उपलब्ध करून देण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरासह तालुक्यातील जनतेचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण ठप्प़़

शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गेल्या शुक्रवारपासून लसअभावी लसीकरण बंद आहे़ सोमवारीदेखील लसीकरण ठप्प होते़ याठिकाणी आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षापुढील व्यक्तींना लस दिली जात आहे़ आतापर्यंत पहिला डोस ७ हजार १८०, तर दुसरा डोस १ हजार ८०१ असे एकूण ८ हजार ९८१ जणांनी लस घेतली आहे़

४१८ ते ४४ वयोगटाकरिता शिरपूर शहरातील क्रांतिनगरातील आर. सी. पटेल शाळेत आतापर्यंत १३५० जणांनी लच टोचली आहे, तर दुसरे केंद्र असलेले आर. सी. पटेल मेन बिल्डिंग इमारतीत सोमवारी शुभारंभाच्या पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या १०० पैकी १०० जणांनी लस घेतली़

४ तालुक्यांतील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील लसीकरण होत आहे़ आतापर्यंत पहिला डोस १८ हजार २९२ व दुसरा डोस २ हजार ७२२ असे एकूण २१ हजार १४ जणांनी लसीकरण करून घेतले आहे़ तसेच होळनांथे, विखरण, वाडी, बोराडी येथे १८ वर्षांपुढील युवकांनादेखील लसीकरण केले जात आहे़

Web Title: Another immunization center for youth in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.