सायंकाळनंतर डॉक्टर ‘नॉटरिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:54 AM2020-02-15T11:54:29+5:302020-02-15T11:55:03+5:30

कापडणे : हेंकळवाडी येथील गर्भवती महिलेला असह्य वेदना, रुग्णवाहिका चालक बेपत्ता

After the doctor doctor notaricable | सायंकाळनंतर डॉक्टर ‘नॉटरिचेबल’

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व रुग्णवाहिका चालक सायंकाळी पाच वाजेनंतर बेपत्ता होत असल्याने सायंकाळनंतर येणाऱ्या रुग्णांना याठिकाणी उपचार मिळणे कठीण झाले आहे. नुकताच ९ तारखेला हेंकळवाडी येथील गर्भवती महिलेला याचा प्रत्यय आला. डॉक्टर व रुग्णवाहिका चालक नसल्याने या महिलेला अक्षरश: वेदना सहन करीत ताटकळावे लागले.
कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व रुग्णवाहिका चालक मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी सातत्याने रुग्ण व नातेवाईकांकडून होत आहेत. या मनमानी कारभाराचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हेंकळवाडी येथील उज्वला विशाल ठाकरे या गर्भवती महिलेला त्रास जाणवू लागला. या गर्भवती महिलेला हेंकळवाडी येथून कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी आरोग्य सेविकेने या महिलेची तपासणी करुन धुळे जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, डॉक्टर व रुग्णवाहिका चालकही धुळे शहरात वास्तव्यास असल्याने संबंधित गर्भवती महिलेला असह्य वेदना सहन करीत ताटकळावे लागले. संबंधित महिलेच्या वेदना जास्त वाढल्याने अखेर गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक महादू पाटील, अमोल प्रकाश माळी यांच्या मदतीने निंबा आधार माळी या चालकाने स्वत: रुग्णवाहिका चालवून धुळे जिल्हा रुग्णालयात नेली.
कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कापडणेसह धनूर, देवभाने, सरवड, दापुरा, दापुरी, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद, विश्वनाथ, सुकवड आदी गावांचा समावेश होतो. कापडणे गावाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. बाहेरगावासह गावातील रुग्ण रात्री अपरात्री त्रास जाणवू लागल्याने कधीही आरोग्य केंद्रात येतात. या आरोग्य केंद्रात २४ तास डॉक्टर असणे गरजेचे आहे. मात्र, सायंकाळी पाच वाजेनंतर डॉक्टर धुळे शहरात निघून जातात.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो. बºयाच वेळेला रुग्णवाहिका चालक नसल्याने रुग्णांना खाजगी चालकांमार्फत घेऊन जावे लागते. डॉक्टर मनमानी कारभार करीत असून रुग्णांची हेळसांड करणाºया संबंधित डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
तीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्येचा भार असणाºया कापडणे आरोग्य केंद्रात नेहमीच महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, याठिकाणी रात्री सी.टी. पाथरे या एकमेव आरोग्यसेविका व एक शिपाई आरोग्य सेवा बजावत असल्याचे दिसून येते. उर्वरित कर्मचारी व डॉक्टर सायंकाळी ५ वाजेनंतर आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवितात. यामुळे सायंकाळनंतर रुग्णांनी कुठे जावे, असा प्रश्न आहे.
डॉक्टरांचे अजब स्पष्टीकरण
रात्री गर्भवती महिलेला त्रास जाणवू लागल्यास आरोग्य केंद्रात प्रमुख डॉक्टर व रुग्णवाहिका चालक असणे गरजेचे राहते. मात्र, याठिकाणी नियुक्त असलेल्या डॉ.नागे यांना याठिकाणी का राहत नाही, असा प्रश्न विचारला असता मला याठिकाणी राहण्यास सरकारी खोली नाही, असे अजब उत्तर त्यांनी दिले.

Web Title: After the doctor doctor notaricable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे