भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:22+5:302021-02-08T04:28:22+5:30

भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. नवीन कांदा ...

Vegetable prices plummeted, onion prices stabilized | भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर

भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर

भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर

उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. नवीन कांदा बाजारात आल्याने भाव ४० ते ५० रुपयांवर स्थिर होते. फळांचा हंगाम संपत आल्याने फळांची दर वाढ झाली आहे. खाद्यतेलाचा दरही वाढत असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. भाजीपाला व फळभाज्यांसाठी मुबलक पाणीसाठा व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, फळभाज्यांचे भाव कोसळू लागले आहेत. बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर असून, कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, शिमला मिरची २० ते ३० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलो, तर टाेमॅटो ५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. पालेभाज्यांचे दरही कमीच असून, मेथी १० रुपये जुडी प्रमाणे, पालक, शेपू, चुका पाच रुपये जुडीप्रमाणे विक्री झाली. फळांचा हंगाम संपत आल्याने फळांच्या दरातही वाढ झाली आहे.

खाद्यतेलाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या सोयाबीन, पामतेल ११४ रुपये, सूर्यफूल तेल १४८ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ ६१, तूर डाळ ८्र०, उडीद डाळ ८०, मूग डाळ ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. डाळींचे दर स्थित आहेत. शेंगदाणा ८५ ते ९५ रुपये किलोदराने विक्री होत आहे.

सफरचंद महागले

बाजारात मागील महिन्याभरापासून सफरचंदाचे दर वाढले असून, सफरचंद १२० ते २०० रुपये किलो, संत्रा ४० ते ५० रुपये, चिकू ४० रुपये, द्राक्षे ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, तर केळी २५ ते ३० रुपये डझनप्रमाणे विक्रीस आहे.

काकडी स्वस्त

मागील काही दिवसांपासून वातावरणात गारठा वाढल्याने काकडीला मागणी घटली आहे. काकडी २० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गाजराचे दर घसरले असून, गाजर १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री हाेत आहे.

प्रतिक्रिया...

पालेभाज्यांचे दर सातत्याने कमी होत आहेत. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकात विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. खाद्यतेलाचे दर मात्र वाढले असल्याने आर्थिक झळ बसत आहे.

सीमा कांबळे, गृहिणी

टोमॅटो व वांगी प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. भाव पडल्याने लागवडीचा खर्चही निघणेही मुश्कील झाले आहे.

शिवाजी वडवराव, धोत्री, शेतकरी

नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने भाव ४० ते ५० रुपयांवर कायम आहे. इतर भाजीपाल्यांची आवक वाढल्याने तो स्वस्त झाला आहे.

महादेव साठे, भाजीपाला विक्रेता

Web Title: Vegetable prices plummeted, onion prices stabilized