अवैध धंद्यांबाबत जबाबदारी होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:10+5:302021-02-07T04:30:10+5:30

कळंब : शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत संबंधितांवर ...

There will definitely be responsibility for illegal trades | अवैध धंद्यांबाबत जबाबदारी होणार निश्चित

अवैध धंद्यांबाबत जबाबदारी होणार निश्चित

कळंब : शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी कळंबचे प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कळंब शहर व तालुक्यात अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. मटका, जुगार क्लब, गावठी दारू, बनावट दारूचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याबाबत सर्वपक्षीय निवेदनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले होते.

या निवेदनात जवळपास सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी एकमुखाने कळंब शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करा व संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती.

याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक रोशन यांनी याप्रकरणी कार्यवाही सुरू केली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने कळंबचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी चौकशी चालू केली आहे. अवैध धंद्यांसंदर्भात व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी म्हणून निवेदन दिलेल्यांपैकी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव संजय घोगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, भाजपच्या अनुसूचित विभागाचे सतपाल बनसोडे यांना याबाबत जबाब देण्यासाठी चौकशी अधिकारी खांबे यांनी पत्र दिले आहे. यानंतर संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जबाब होईल व त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कळंब शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत आता निर्णायक भूमिका घेतल्याने या धंद्यावर आता तरी आळा बसेल, अशी अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.

चौकट -

आम्ही सर्वपक्षीय मंडळींनी कळंब शहर व तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठवला आहे. तरीही अवैध धंदे चालूच आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाने आम्हाला पत्र दिले आहे. त्यासाठी आज मी जबाब देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गेलो होतो; परंतु आज जबाब घेतला नाही. नंतर कधीही पोलीस प्रशासनाने बोलाविले तरी आमची सहकार्याची भूमिका राहील.

- सतपाल बनसोडे, तक्रारदार

Web Title: There will definitely be responsibility for illegal trades