अधिकाऱ्यांनी जबाब फाडल्याने तणाव

By Admin | Updated: July 3, 2014 00:20 IST2014-07-02T23:40:06+5:302014-07-03T00:20:06+5:30

येरमाळा : कार्डधारकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाबाबत कार्डधारकांकडे चौकशी करून जबाब घेण्याचे काम चालू असतानाच एका अधिकाऱ्याने जबाब फाडून टाकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

Tensions by officers tearing off | अधिकाऱ्यांनी जबाब फाडल्याने तणाव

अधिकाऱ्यांनी जबाब फाडल्याने तणाव

येरमाळा : कार्डधारकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाबाबत कार्डधारकांकडे चौकशी करून जबाब घेण्याचे काम चालू असतानाच एका अधिकाऱ्याने जबाब फाडून टाकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कळंब तालुक्यातील उपळाई येथे बुधवारी हा प्रकार घडला.
याबाबत माहिती अशी की, उपळाई येथे दोन रेशनदुकान असून, या दुकानदारांसंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यावर २२ नोव्हेंबर २०१३ रोजी उपविभागीय अधिकारी सचिन बावरकर यांनी चौकशी करून रेशन दुकानदार दोषी आढळल्याने पर्यायी व्यवस्थाही केली होती. परंतु, यानंतर रेशन दुकानदारांनी या सर्व तक्रारी चुकीच्या असल्याचे सांगत आम्ही व्यवस्थित वितरण करतो, असे सांगून फेब्रुवारीपासून पुन्हा दुकान सुरू केले होते.
दरम्यान, याबाबत पुन्हा उपळाई येथील २३७ ग्राहकांनी थेट राज्य शासनाच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. यावरून बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, नायब तहसीलदार शिवानंद बिडवे, एन. आर. काटे, मोहिते, वाघमारे, मंडल अधिकारी बी. ई. ओव्हाळ यांचे पथक चौकशी करून जबाब नोंदविण्यासाठी उपळाई गावात दाखल झाले होते. यावेळी पांडुरंग नागरगोजे या कार्डधारकाची चौकशी करून जबाब घेतल्यानंतर त्यांनी जबाब वाचून दाखवा, अन्यथा जबाब बदला, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावरूनच संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा घेतलेला जबाब फाडून टाकला. यामुळे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा तणाव शांत केला.
दरम्यान, बुधवारी एकूण ८४ जणांचे जबाब घेण्यात आले. यापैकी ६८ जणांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Tensions by officers tearing off