उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने बससेवा बंद केली होती. परंतु, कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ७ जूनपासून राज्यातील बससेवा सुरू झाली. यात आंतरराज्य बससेवा बंद होती. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे आंतरराज्य बससेवा सुरू करावी, अशी प्रवाशांकडून केली जात होती. या अनुषंगाने एसटीने गेल्या आठवड्यापासून बससेवा सुरू केली आहे. बसेसला जिल्ह्यातून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट धडकली. कोरोना संसर्गास प्रतिबंध बसावा, यासाठी राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून एसटीची बससेवा बंद केली होती. तब्बल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्याने बसेस सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ७ जूनपासून बसेस धावू लागल्या आहेत. मात्र, आंतरराज्य बससेवा बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातून बाहेर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे आंतरराज्य बससेवा सुरू करण्याची मागणी पुढे येत होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता महामंडळाने मागील आठवड्यापासून हैदराबाद मार्गावर धावणाऱ्या सहापैकी पाच बसेस सोडल्या जात आहेत. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून उस्मानाबाद-सुरत बस सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हैदराबाद मार्गावरील रात्रीच्या बसेसला प्रवासी नसल्याने एक बस बंद आहे.
पुणे, सोलापूर, लातूर मार्गावर गर्दी
राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाल्यापासून उस्मानाबाद विभागातील बसेस नियमित धावत आहेत. सध्या मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर या मार्गावर धावणाऱ्या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे या मार्गावर महामंडळाने बसफेऱ्या वाढविल्या आहेत.
पणजी, बंगलोर बस बंदच
राज्यातील विविध मार्गावर बसेस दररोज धावत आहेत. बसला दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, आंतरराज्य मार्गावर धावणाऱ्या पणजी, बंगलोर बसला प्रवासी मिळत नसल्याने त्या बसेस बंद आहेत. शिवाय, ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या बसेस बंद आहेत.
दुसऱ्या राज्यातील मार्गावर रात्री प्रवासी मिळेनात
उस्मानाबाद आगारातील चार बसेस हैदराबाद मार्गावर धावतात. एक बस रात्री, तर तीन बसेस दिवसा धावत असतात. मात्र, सध्या कोरोना प्रतिबंधासाठी सायंकाळी पाच वाजेनंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी बसला प्रवासी मिळत नाहीत. परिणामी, रात्री धावणारी बस बंद आहे, तर उर्वरित तीन बसेसला दिवसा प्रवासी मिळत आहेत.
२२ लाखांचा तोटा
लॉकडाऊनपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागातील ४५० बसेसच्या दिवसाकाठी दोन हजार फेऱ्या होत असत. प्रतिदिन एक लाख २५ हजार प्रवासी प्रवास करीत होते. यातून महामंडळास प्रतिदिन ५० लाखांचे उत्पन्न मिळत असे. सध्या बससेवा सुरू झाली असली तरी ती पूर्णपणे सुरू झालेली नाही. केवळ २६७ बसेसच्या ८०० च्या जवळपास फेऱ्या होत आहेत. प्रतिदन ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करीत असून, महामंडळास २८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही दररोज २२ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
पॉईंटर
जिल्ह्यातील एकूण आगार ६
एकूण बसेस ४५०
सध्या सुरू असलेल्या एकूण बसेस २६७
रोज एकूण फेऱ्या ८००
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस ५