भूम : दुकानातून माल खरेदी केल्यानंतर त्यापोटी काही रकमेचा बनावट धनादेश देत उर्वरित रक्कम एटीएममधून आणून देतो, असे सांगून दोघांनी दुकानदाराची फसवणूक केली. ही घटना भूम शहरात घडली. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील अभिजीत गाढवे यांचे बसस्थानकानजीक अधिराज एजन्सी नावाचे दुकान आहे. २७ डिसेंबर २०२० रोजी बाळासाहेब मोरे व सचिन ऊर्फ मारूती चंद्रकांत भोर हेदोघेजण या दुकानात सिमेंट व सळई खरेदीसाठी आले होते. त्यांनी एकूण १ लाख १८ हजार ८०१ रुपये किंमतीचा माल खरेदी केला. यापोटी त्यांनी ६८ हजार ८०० रुपयांचा धनादेश दिला तर उर्वरित पन्नास हजार रुपये एटीएममधून आणून देतो, असे सांगून ते दोघे निघून गेले. बराच वेळ झाला तरी यापैकी कुणीच परत न आल्याने गाढवे यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी समोरील व्यक्तीने एटीएममध्ये पैसे नाहीत, दुसऱ्या दिवशी आणून देतो, असे सांगितले. मात्र, नंतरही पैसे मिळाले नाहीत. शिवाय, या लोकांनी दिलेला धनादेश गाढवे यांनी बँकेत वठविण्यासाठी दिला असता तोही न वठता परत आला.
दरम्यान, यानंतर गाढवे यांनी मात्रेवाडी या त्यांच्या गावी जाऊन चौकशी केली असता हे दोघेही बारामती येथील रहिवाशी असल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात भादंसं कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ रब्बानी जुनैदी करीत आहेत.