गरज भासल्यास खासगी डॉक्टरांचीही सेवा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST2021-04-12T04:29:51+5:302021-04-12T04:29:51+5:30

उमरगा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ज्या भागात रुग्ण आढळत आहेत तेथील उपाययोजनांवर लक्ष ...

Seek the help of a private doctor if needed | गरज भासल्यास खासगी डॉक्टरांचीही सेवा घ्या

गरज भासल्यास खासगी डॉक्टरांचीही सेवा घ्या

उमरगा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ज्या भागात रुग्ण आढळत आहेत तेथील उपाययोजनांवर लक्ष द्यावे. तसेच आरोग्य विभागाला आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्यास त्यांनी खासगी डॉक्टर व शिकाऊ आरोग्य सेवकांची सेवा घ्यावी, अशा सूचना केंद्रीय पथकाने येथे दिल्या.

जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या दोन सदस्यीय केंद्रीय आरोग्य पथकाने रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत रुग्णालयातील लसीकरण, लसींची उपलब्धता, रुग्णांबाबतीत केलेली व्यवस्था व संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून केल्या गेलेल्या उपाययोजना, याबाबतची माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.

तब्बल तीन तासांच्या भेटी दरम्यान पथकाने कोविड लस नोंदणी विभाग, लसीकरणासाठी आलेले लसीकरण प्रतीक्षा कक्षातील नागरिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी पथकातील पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट डाॅ. अजित शेवाळे व डाॅ. लोकेंद्र कुमार यांनी रुग्णालयातील कोविड लस उपलब्धता, मागणी व साठा, औषध साठा, कामकाजाची माहिती घेतली. रुग्ण संख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या पर्यायी व्यवस्थेबाबत विचारणा केली असता उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी शहरातील शिवाजी महाविद्यालयाचे वसतिगृह तसेच शाळा यांचे अधिग्रहण करून तेथे कोविड रुग्णाची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी केंद्रीय पथकांकडून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असेल तर खासगी डॉक्टर व शिकावू आरोग्य सेविकाची सेवा घेण्याच्या सूचना दिल्या. महसूल, नगरपालिका, पंचायत समिती व पोलीस प्रशासनाने कोरोना प्रतिबंधित क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंखे, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Seek the help of a private doctor if needed