खासगीकरणाला विराेध : सरकारच्या धाेरणाचा नाेंदविला निषेध
उस्मानाबाद : नवीन माेटार वाहन कायद्याच्या अनुषंगाने नव्या गाड्यांची नाेंदणी वितरकांमार्फत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून केंद्र सरकारने माेटार वाहन विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातल्याचा आराेप करीत ‘आरटीओ’ कर्मचारी संघटनेच्यावतीने ७ जुलै राेजी कार्यालयासमाेर काळ्या फिती लावून निदर्शने केली.
केंद्र सरकारने संसदेत माेटार वाहनविषयक कायदा मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार आता नवीन गाड्यांच्या नाेंदणीचे काम वितरकांमार्फत केले जाणार आहे. कायद्यातील सुधारणांच्या नावाखाली खासगीकरण व कंत्राटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आराेप करीत आरटीओ कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदाेलनाची हाक दिली हाेती. त्यानुसार ७ जुलै राेजी सकाळी कर्मचाऱ्यांच्यावतीने आरटीओ कार्यालयासमाेर जाेरदार निदर्शने केली. केंद्र सरकारने संभाव्य खासगीकरण थांबवावे. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच जनताभिमुख धाेरण राबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर आंदाेलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदाेलनात संघटनेचे पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.