तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : अवैध उत्खननावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील ढेकरी शिवारात घडली आहे. याप्रकरणी सोमवारी तुळजापूर ठाण्यात पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौण खनिज मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यावर कार्यवाहीसाठी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पथकातील गौणखनिज विभागाचे पी. ए. बांगर, तलाठी राजेश पालमपल्ले, तलाठी जी. डी. जगताप हे तुळजापूर तालुक्यातील ढेकरी शिवारात गेले होते. गट क्रमांक १२१ मध्ये एका जेसीबीच्या साहाय्याने मुरूमाचे अवैध उत्खनन व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरु होती. दरम्यान, महसूलच्या पथकाने जेसीबी चालक आनंद बिभीषण कदम यास उत्खनन बाबत विचारपूस केली असता, त्याने ही शेती आपली असून, त्यात मी काहीही करीन, असे म्हणत हुज्जत घातली. शिवाय, शेतात तुम्ही पाय ठेवला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, अशी धमकी पथकाला दिली. याचवेळी बिभीषण कदम हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनीही पथकास शिवीगाळ करुन त्यांच्यावर दगडफेक केली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तलाठी राजेश पालमपल्ले यांनी तक्रार दिली आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून मुरुमाची चोरी, शासनाचा महसूल बुडवून हुज्जत घालणे, धमकी देऊन मारहाणीचा प्रयत्न करीत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आनंद कदम, बिभीषण कदम यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.