Join us
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 08:38 IST

Petrol Diesel Price: सध्या संपूर्ण जग इराण युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे होरपळून निघत आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यानं जगभरातील देश इंधनाच्या टंचाईनं आणि महागाईनं त्रस्त आहेत. मात्र, या जागतिक संकटाच्या काळातही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol Diesel Price: सध्या संपूर्ण जग इराण युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे होरपळून निघत आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यानं जगभरातील देश इंधनाच्या टंचाईनं आणि महागाईनं त्रस्त आहेत. मात्र, या जागतिक संकटाच्या काळातही भारतातपेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर, देशात इंधनाचे संकट आहे का? किंवा दर वाढणार आहेत का? अशा चर्चांना उधाण आलंय.

जगातील पेट्रोल दरांची सद्यस्थिती

'ग्लोबल पेट्रोल प्राईस'च्या ताज्या आकडेवारीनुसार, जगभरातील विविध देशांत पेट्रोलचे दर काय आहेत ते पाहू.

२५ देशांत पेट्रोलचा दर ५० ते ९९ रुपयांच्या दरम्यान आहे.
७२ देशांत हा दर १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान आहे.
४१ देशांत १५० ते २०० रुपये प्रति लिटर दरानं पेट्रोल विकलं जात आहे.
२२ देशांत पेट्रोलचा दर २०० ते ३०० रुपयांच्या घरात आहे. तर २ देशांत पेट्रोलने ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

कोणत्या देशांत किती झाली दरवाढ?

विविध देशांतील इंधन दरवाढीची टक्केवारी पाहता परिस्थितीची भीषणता लक्षात येते. 

  • लाओस: डिझेल १४९.७% आणि पेट्रोल ३५.८% महागलं.
  • म्यानमार: पेट्रोलमध्ये ८९.७% आणि डीझेलमध्ये ११२.७% ची प्रचंड वाढ.
  • पाकिस्तान: पेट्रोलच्या दरात ५४.९% ची वाढ.
  • श्रीलंका: पेट्रोल ३८.२ टक्क्यांनी महागलं.
  • अमेरिका आणि युएई: अमेरिकेत पेट्रोल ४४.५ टक्क्यांनी महागले आहे, तर युएईमध्ये पेट्रोल ५२.४% आणि डिझेलच्या किमतीत ८६% वाढ झाली आहे.
  • युरोपीय देश: फ्रान्स (२०.९%), बेल्जियम (२५.३%) आणि युकेमध्ये (१९.२%) दरवाढ नोंदवण्यात आली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी

इराण युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 'ब्रेंट क्रूड' ऑईलची किंमत प्रति बॅरल ७१ डॉलर्सवरून थेट १०७ डॉलर्सवर पोहोचली आहे. अशा स्थितीतही भारतात पेट्रोल-डीझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

भारतात किती साठा?

जगभरात इंधनासाठी हाहाकार माजलेला असताना भारताकडे पुरेसा साठा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारताचा ऊर्जा साठा मजबूत असून देशाकडे खालीलप्रमाणे 'रोलिंग स्टॉक' उपलब्ध आहे:

  • कच्चं तेल: ६० दिवसांचा साठा.
  • नैसर्गिक वायू: ६० दिवसांचा साठा.
  • एलपीजी: ४५ दिवसांचा साठा.
     

त्यामुळे जागतिक स्तरावर कितीही उलथापालथ झाली, तरी भारताकडे सध्या पुरेसा साठा असल्यानं परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Global Fuel Crisis: India's Stable Petrol-Diesel Prices Amidst Rising Costs

Web Summary : Global fuel prices surge due to conflict, impacting many nations. Surprisingly, India maintains stable petrol and diesel costs, backed by sufficient reserves. Government assures adequate stock levels.
टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेलभारत