राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:12+5:302021-07-12T04:21:12+5:30

नळदुर्ग : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. ...

The national highway is becoming a death trap | राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

राष्ट्रीय महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

नळदुर्ग : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. अनेक ठिकाणी सेवा मार्गाचे काम अद्याप झाले नसून, नऊ पूल अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. शिवाय, आवश्यक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय केलेली नाही. यातूनच शुक्रवारी रात्री पावसामुळे रस्त्यालगत थांबलेली कार पाण्यात वाहून जाऊन दरीत कोसळल्याची घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून यातील आठ जण बालंबाल बचावले.

रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रस्त्याच्या बाजूने रोडवरील व शिवारातील पाणी वाहून जाण्यासाठी नाला खोदून पाण्याचा निचरा होण्याची सोय करणे आवश्यक आहे. मात्र, या महामार्गावर तशी सोय कोठेच केलेली नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री नळदुर्ग-जळकोट परिसरात मोठा पाऊस झाला. यावेळी जळकोट शिवारातील पाणी रस्त्यावर आल्याने अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने उभे करून वाहनातच बसले होते. मात्र, पावसात वाढ झाल्याने रस्त्यावर मोठ्या पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर उभी असलेली लहान वाहने तरंगून प्रवाहाच्या दिशेने जाऊ लागली. यातच पुण्याहून नळदुर्ग मार्गे कर्नाटकात जाणारी कार (क्रमांक एम. एच. १२ / क्यू. एम. ३६०६) उचलली जात होती. यावेळी चालक बाबू शेख (४२) यांनी सतर्कता दाखवत सिटबेल्ट रस्त्यावरील दगडी खुंटीला बांधून कारमधील त्यांच्या पत्नी शकिरा बाबू शेख (३७) व सहा मुली सादिया (१७), तबस्सूम (१०), बुशरा (१२), आलिया (८), फातिमा (६) आणि दोन महिन्याच्या दिलशाद यांना बाहेर काढले. या वेळी त्यांना अन्य वाहनातील चालक व उपस्थित नागरिकांनीदेखील मदत केली. त्यामुळे कारमधील आठ जण बालंबाल बचावले. कारमधील लोक बाहेर पडताच ही कार रस्त्यावरील खुंटीसह जवळील मोरे पुलात ३० फूट खोल दरीत कोसळली. केवळ चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने कारमधील आठ जणांचे प्राण वाचले. दरम्यान, या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता. सोलापूर टोलवेजचे व्यवस्थापक प्रकाश दास यांच्याशी संपर्क साधला असता ‘उद्या फोन करा’, असे सांगून त्यांनीही फोन बंद करून ठेवला.

Web Title: The national highway is becoming a death trap