उमरगा : तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने कोरोना काळात राबविण्यात आलेल्या ‘शिक्षणाचा लाऊड स्पीकर’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात आता राज्यातील इतरही शाळांमधून केली जात आहे. शिवाय, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनेदेखील नुकत्याच झालेल्या ‘पेरेन्ट्स टॉक’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाची दखल घेतली आहे.
आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या कोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने कोरोना काळात शैक्षणिक वातावरण टिकून राहावे. विद्यार्थ्यांना पाढे, प्रार्थना, गोष्टी, कविता, महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी कळाव्यात, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शाळा सुरू झालेल्या दिवसापासून सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत गावातील हनुमान मंदिराच्या स्पीकरवरून दररोज अभ्यास घेतला जात आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या गृहभेटी, पालकभेटी घेऊन विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम, तसेच स्पीकरवरून दिलेला अभ्यासक्रम तपासला जात आहे. त्यामुळे राज्यातील इतर शाळांसाठीदेखील हा उपक्रम मार्गदर्शक ठरत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनीदेखील या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेतली. यासंदर्भात एससीईआरटीच्या वतीने ‘पेरेन्ट्स टॉक’ नावाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात अंकिता अजित बंडगर, गुरुनाथ बुलबुले या पालकांसह मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान पालकांना ‘शिक्षणाचा लाऊड स्पीकर पॅटर्न’ याविषयी प्रश्न विचारून कोरोना काळात शाळेचे प्रयत्न, अंमलबजावणी, उपयोगिता, पालकांचा सहभाग, शिक्षकांचे योगदान आदी विषयांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात आली. या कार्यक्रमाला युनिसेफच्या सुनिषा आहुजा यांच्यासह राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, एससीईआरटीच्या किरण धांडे, अनुराधा चव्हाण, मैथिली गुप्ते, रेश्मा अग्रवाल, प्रथम संस्थेच्या फरिदा लांबे तसेच डाएटचे प्राचार्य बळीराम चौरे, अधिव्याख्याते डॉ. इब्राहिम नदाफ, नारायण मुदगलवाड, तानाजी खंडागळे आदी ऑनलाईन सहभागी झाले होते. बिराप्पा शिंदे यांनी या मुलाखती घेतल्या.