तामलवाडी (जि. उस्मानाबाद) - तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील महिला शेतकर्याने अवघ्या १० गुंठे क्षेत्रातील वांग्याच्या पिकातून सुमारे ८० हजारांचे उत्पन्न घेतले. वांग्यास प्रतिकिलाे २० ते २५ रूपये एवढा दर मिळाला.
सांगवी शिवारात सविता तुकाराम मगर याची सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गालगत शेती आहे. पाण्याचा शाश्वत स्त्रोत असल्याने त्यांनी शेती बरोबर भाजीपाला शेतीचे नियोजन केले. आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सहनकरीत अवघ्या १० गुंठे क्षेत्रात वांग्याची लागवड केली. सुयाेग्य नियाेजन, वेळाेवेळी किटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे वांग्याचे पीक जाेमदार आले. बाजारपेठेतही वांग्यास ठाेक स्वरूपात प्रतिकिलाे २० ते २५ रूपये दर मिळाला. या माध्यमातून अवघ्या दीड महिन्यात ८० हजारांचे उत्पन्न हाती पडले. आणखी महिनाभर वांग्याची ताेडणी चालेल. यातून उत्पन्नात आणखी भर पडेल, असा विश्वास महिला शेतकरी सविता मगर यांनी बाेलून दाखविला.
चाैकट...
स्वत बाजारपेठेत केली विक्री
शेतात निघालेली वांगी व्यापार्यांना विक्री न करता सविता मगर या स्वत बाजारपेठेत जातात. त्यामुळे वांग्यास इतरांच्या तुलनेत चांगला दर मिळताे. इतर शेतकर्यांनी उत्पादक ते विक्रेता अशी भूमिका निभावल्यास निश्चित शेती फायद्याची ठरते, असे मगर यांनी नमूद केले.
तलावामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी...
सांगवी गावच्या उशाला दोन तलाव आहेत. ते तुडूंब भरल्याने विहरीची पाणी पातळी टिकून आहे. पाण्याचा स्त्रोत निर्माण झाल्याने शिवारात फळबागेसह पालेभाज्यांची लागवड केली आहे. या माध्यमातून शेतकर्यांची आर्थिक उन्नती हाेऊ लागली आहे.