अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:16+5:302021-07-25T04:27:16+5:30

उस्मानाबाद : येथील महामार्ग हे जणू अमली पदार्थांच्या तस्करीचे राजमार्गच बनले आहेत. मुंबई, पुणे ते हैद्राबाद, बेंगळुरू अशा मेट्रो ...

Drug smugglers | अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या

अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या

उस्मानाबाद : येथील महामार्ग हे जणू अमली पदार्थांच्या तस्करीचे राजमार्गच बनले आहेत. मुंबई, पुणे ते हैद्राबाद, बेंगळुरू अशा मेट्रो सिटीतील मागणी अन् त्याच्या पुरवठ्यासाठी जिल्ह्यातून चालणाऱ्या तस्करीचा बाजारच गुन्हे शाखेने उठविला आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल सव्वाकोटींचे अमली पदार्थ जप्त करून, तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

उस्मानाबाद जिल्ह्यातून सोलापूर-धुळे, रत्नागिरी-बुटीबोरी व पुणे-हैद्राबाद असे तीन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. या मार्गाद्वारे महाराष्ट्राची कनार्टक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांशी कनेक्टिव्हिटी दृढ झाली आहे. वाहतूक गतिमान झाल्याने व या राज्यांतील मेट्रोसिटींची थेट कनेक्टिव्हिटीची सोय झाल्याने या मार्गावरून अमली पदार्थांच्या तस्करीचा बाजारही जोर धरू लागला. विशेषत: उमरगा-सोलापूर, उमरगा-तुळजापूर-औरंगाबादमार्गे ही तस्करी वाढली. परिणामी, पोलिसांपुढील आव्हानेही वाढली. या तस्करीचा बाजार मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह त्यांच्या टीमने खबऱ्याचे नेटवर्क मजबूत केले. त्यामुळे केवळ वाहतूकच नव्हे, तर जिल्ह्यात कोठे साठा केला गेला, याचीही माहिती उघड होऊ लागली. यातूनच मागील सात महिन्यांत सव्वाकोटींचे अमली पदार्थ जपत करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले. गुन्हे शाखेसोबतच तुळजापूर, नळदुर्ग, कळंब, उमरगा पोलिसांनीही अशा कारवाया वाढविल्या आहेत.

चोर्या-घरफोड्यांना वेसण...

जिल्ह्यात १ जानेवारी ते आजतागायत दिवसा झालेल्या घरफोड्यांपैकी तब्बल ४३ गुन्हे उकलण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये चोरांकडून २२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल रिकव्हर करता आला, तसेच ४७ अन्य चोऱ्या उघड करून, २४ लाख २४ हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. जबरी चोरीचे ३ तर मारहाण करून, जबरी चोरीचे ४ गुन्हेही उघड झाले. यातील ८ लाख ९५ हजारांचा ऐवज परत मिळविण्यात आला आहे. दरोड्याचा १ गुन्हाही उघड करून, १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल रिकव्हर केला आहे. दारूबंदीच्या कारवाया करताना १० लाखांची दारू पकडण्यात आली. जवळपास ३ लाखांचा गुटखाही गुन्हे शाखेने या काळात पकडला आहे.

कोट...

पोलीस अधीक्षक राज तिल रौशन यांच्या सूचनेनुसार, तपासकामी असणारी टीम तांत्रिकदृष्ट्या सक्षम करीत गुन्ह्यांची उकल करणे सुरू केले. त्याला बऱ्यापैकी यश मिळत गेले. आव्हान ठरू लागलेले गुन्हेही उकलण्यात यश आले. चोऱ्या व अन्य गुन्ह्याचे प्रमाण यामुळे काहीसे कमी करता आले, पण म्हणून पोलीस स्वस्थ बसलेले नाहीत. रोज नवी आव्हाने असतात. आता धानुरी, येडशी, वाशीच्या घरफोड्या उकलण्याचे नवे आव्हान आमच्यासमोर आहे. स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखाही स्वतंत्रपणे तपास करून त्यांचा छडा लावेल.

- गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा

Web Title: Drug smugglers