गॅसच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST2021-07-26T04:29:34+5:302021-07-26T04:29:34+5:30

बालाजी बिराजदार लोहारा : गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला ...

Budget collapses due to gas price hike! | गॅसच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडले !

गॅसच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडले !

बालाजी बिराजदार

लोहारा : गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे लागत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात महिनाभरात २६ रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरचे दर ५३ रुपयांनी वाढले असून, तेल, डाळीपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंना महागाईचा तडाखा बसल्याने नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे तीन ते चार महिने लॉकडाऊनमध्ये घरी बसावे लागले. नंतरच्या चार-पाच महिन्यांनी गाडी रुळावर येते आहे असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. या परिस्थितीमुळे सगळ्याच घटकांचा आर्थिक स्तर खालावला आहे. असे असताना महागाई कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २६ रुपयांनी वाढ झाली. दुसरीकडे तेल, डाळ, कडधान्यासह आदी जीवनावश्यक वस्तूंचेही दरही वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी पैसे मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी अगोदरच त्रस्त झालेले असताना गॅस दरवाढ करून जनतेला फटका बसला आहे. घरगुती गॅस २६ रुपयांनी, तर व्यावसायिक गॅस ५३ रुपयांनी वाढला असून, याची सबसिडीदेखील मिळत नाही. त्यातच लोहारा शहरात कोणत्याच गॅस कंपनीची एजन्सी नसून, सर्वच गॅस कंपनीचे सबडीलर आहेत. परिणामी गॅसच्या मूळ किमतीपेक्षा भाडे, हमाली व कमिशन यामुळे शहरात सद्य:स्थितीत घरगुती गॅस ८८० ते ९०० रुपयाला, तर व्यावसायिक गॅस १६०० ते १६५० रुपयाला मिळत आहे.

चौकट...

उज्ज्वला गॅस कनेक्शन ज्या कुटुंबांनी घेतले त्यांनीही सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे गॅस वापरणे बंद केले असून, आपली चूलच बरी असे म्हणत चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याचे दिसत आहे. उज्ज्वला गॅस कनेक्शन घेतलेले ५० ते ६० टक्के नागरिक सिलिंडर घेऊन जात नाहीत.

- मनोज मलाडे, सबडीलर

गेल्या वर्षापासून पेट्रोल - डिझेलचे भाव वाढल्याने गॅस सिलिंडर, तेल, डाळी, कडधान्य, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली. यामुळे यावर तर खर्च करावाच लागणार आहे. अशा परिस्थितीत घर चालवायचे कसे, हा मोठा प्रश्न असून, महागाईवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

- जान्हवी घोडके, गृहिणी, लोहारा

Web Title: Budget collapses due to gas price hike!