पीककर्ज वाटपास बँका उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST2021-07-26T04:29:29+5:302021-07-26T04:29:29+5:30
अजीत चंदनशिवे तुळजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकार, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या उरकल्या, तरीही बँकांकडून अद्याप कर्ज वाटपाला गती ...

पीककर्ज वाटपास बँका उदासीन
अजीत चंदनशिवे
तुळजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकार, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या उरकल्या, तरीही बँकांकडून अद्याप कर्ज वाटपाला गती मिळाली नसल्याचे दिसत आहे. आजवर राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती अशा एकूण १७ बँकानी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३९ टक्के कर्जाचे वितरण केले असून, या माध्यमातून जवळपास दहा हजार ६७२ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाखांचे वितरण करण्यात आले आहे. कर्जाची मागणी केलेल्या २९१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव अजूनही बँकाकडे प्रलंबित आहेत.
कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, अशा निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणाचा फटकाही नेहमीच सहन करावा लागतो. गतवर्षी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासूनही बहुतांशी शेतकरी वंचित राहिले, शिवाय दीड वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
दरम्यान, यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. यामुळे खासगी सावकार, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या केल्या, परंतु बॅंकाकडून मात्र पेरणी कालावधीत पीककर्ज मिळाले नसल्याचे बँकाकडून कर्ज वाटप केलेल्या उद्दिष्टाच्या टक्केवारी वरून दिसून येत आहे. तुळजापूर शहरासह तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४ शाखा, बँक ऑफ महाराष्ट्राच्या २, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ६, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय, ॲक्सिस, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा एकूण १७ बँकांना खरीप हंगामासाठी २३५ कोटी ७९ लाख एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. एप्रिलपासून तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना या बँकेमार्फत पीककर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत या बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत २३ जुलैपर्यंत तालुक्यातील १० हजार २६३ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ही टक्केवारी ३९ इतकी आहे. त्यामुळे बँकांच्या अहवालानुसार, २८४ शेतकरी अजूनही पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट.......
असे झाले कर्ज वाटप...
सहायक निबंधक कार्यालयाकडून २३ जुलैअखेर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, तुळजापूर शहरासह तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच शाखांनी ७७ कोटी ९८ लाख उद्दिष्टापैकी २ हजार ३७५ शेतकऱ्यांना ७७ कोटी ९८ लाख रुपये एवढे पीककर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या दोन शाखांनी ४९ कोटी ५० लाख एवढ्या उद्दिष्टापैकी ९०९ शेतकऱ्यांना १० कोटी ४२ लाख पीककर्ज वितरण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहा शाखांना ४२ कोटी ७ लाख एवढे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यांनी २२ कोटी ८५ लाख एवढे पीककर्ज २ हजार १० शेतकऱ्यांना वितरण केले आहे, तर आयडीबीआय बँकेला १० कोटी १३ लाख एवढे उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी त्यांनी २१० शेतकऱ्यांना २ कोटी ७९ लाख पीककर्ज वाटप केले आहे. आयसीआयसीआय बँकेने १२ कोटी ८९ लाख एवढे उद्दिष्ट होते. त्यापैकी १२५ शेतकऱ्यांना ३ कोटी १० लाख एवढे पीककर्ज वाटप केले आहे. ॲक्सिस बँकेने ५ कोटी ७० लाख उद्दिष्टापैकी ७५ शेतकऱ्यांना १ कोटी ४४ लाख एवढे कर्ज वाटप केले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेने २८ कोटी ५२ लाख उद्दिष्टापैकी ४ हजार ९७४ शेतकऱ्यांना २० कोटी ९७ लाख पीककर्जाचे वितरण केले आहे.