जातीचा उंबरठा ओलांडणारी ८५ जाेडपी ‘कन्यादाना’पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:33+5:302021-02-08T04:28:33+5:30

दाेन वर्षांपासून अनुदान मिळालेच नाही -पत्रावर पत्र पाठवूनही सरकारकडून दखल नाही उस्मानाबाद -जातीचा उंबरठा ओलांडून विवाह करणाऱ्यांना किमान आधार ...

85 ZPs who cross the caste threshold are deprived of 'Kanyadana' | जातीचा उंबरठा ओलांडणारी ८५ जाेडपी ‘कन्यादाना’पासून वंचित

जातीचा उंबरठा ओलांडणारी ८५ जाेडपी ‘कन्यादाना’पासून वंचित

दाेन वर्षांपासून अनुदान मिळालेच नाही -पत्रावर पत्र पाठवूनही सरकारकडून दखल नाही

उस्मानाबाद -जातीचा उंबरठा ओलांडून विवाह करणाऱ्यांना किमान आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने कन्यादान याेजना सुरू केली; परंतु याही याेजनेला सरकारच्या उदासीनतेचा फटका बसला. मागील दाेन वर्षांपासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना अनुदान देण्यासाठी सरकारकडून निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जिल्हाभरातून आलेले असे जवळपास ८५ प्रस्ताव अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

समाजातील जातीव्यवस्था झुगारून आंतरजातीय विवाह करणे ही बाब आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही अत्यंत हिमतीची आहे. असा विवाह करणाऱ्यांना बऱ्याचदा स्वत:च्या कुटुंबासह आप्त मित्रांपासूनही दूर राहावे लागते. अशा काळात संबंधितांना थाेडाबहुत आर्थिक हातभार लागावा, यासाठी शासनाने कन्यादान याेजना सुरू केली. सुरुवातीच्या काळात या याेजनेच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर हाेताच शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात हाेते; परंतु २०१७-१८ पासून यात विस्कळीतपणा आला आहे. मागील दाेन ते तीन वर्षांत जिल्हाभरातून सुमारे ८५ प्रस्ताव दाखल झाले हाेते. हे प्रस्ताव शासनाकडे सादर करून अनुदानाची मागणी करण्यात आली. २०१७-१८ मध्ये काही प्रमाणात अनुदानासाठीची रक्कम प्राप्त झाली; परंतु त्यातून सर्वच लाभार्थींना पैसे देता आले नाहीत. यानंतर मागील दाेन वर्षांत छदामही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे यातील अनेक लाभार्थी समाजकल्याण विभागाकडे चकरा मारताहेत; पण शासनाकडूनच निधी मिळत नसल्याने अधिकाऱ्यांचाही नाइलाज झाला आहे. दरम्यान, अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी यासाठी समाजकल्याण विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, अद्याप अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे आंतरजातीय विवाहांना प्राेत्साहन देण्याचा शासनाचा मनाेदय केवळ कागदाेपत्री दिसून येत आहे.

५० हजारांचे अनुदान..

या याेजनेतून प्रत्येक जाेडप्याला ५० हजार रुपये अनुदान धनादेशाद्वारे दिले जाते. पूर्वी काही अनुदान राेख स्वरूपात तर काही वस्तू स्वरूपात दिले जात हाेते. त्यावेळी अनुदानाची रक्कम १५ हजार रुपयांच्या मर्यादेत हाेती. मात्र, २०१० पासून अनुदानाची रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे. ही रक्कमही वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चाैकट..

८४-८५

दाेन वर्षांत झालेले आंतरजातीय विवाह

००.००

जाेडप्यांना मिळालेली शासकीय मदत

अशी मिळते मदत...

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते.

शासकीय याेजनेतून यांना मिळते अनुदान...

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना शासकीय कन्यादान याेजनेतून अर्थसाहाय्य दिले जाते. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी आदी मागास प्रवर्गातील एखाद्या व्यक्तीचा इतर मागासवर्ग किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाेबत विवाह झाल्यास असे जाेडपे शासकीय मदतीला पात्र ठरते. शिवाय एका मागास प्रवर्गातील व्यक्तीने दुसऱ्या मागास प्रवर्गातील व्यक्तीसाेबत विवाह केला तरी ते जाेडपे मदतीसाठी पात्र ठरते.

केंद्र अन् राज्य सरकारचा ताळमेळ बसेना...

कन्यादान अनुदान याेजनेसाठी राज्य व केंद्र शासन पैशाचा भार उचलते. मात्र, मागील दाेन वर्षांपासून केंद्र सरकारने आपला हिस्सा राज्य सरकारकडे जमा केलेला नाही, तर दुसरीकडे राज्य सरकारनेही काेराेनासह अन्य कारणे देत आपला हिस्साही जिल्हास्तरावर दिलेला नाही. त्यामुळे दाेन-दाेन वर्षांपासून लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, काही दिवसांत अनुदान उपलब्ध हाेईल, असे समाजकल्याण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

काेट..

जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या पात्र प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. मागील दाेन वर्षांत आपल्याकडे आलेले ८४-८५ प्रस्ताव मंजूर आहेत. शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला जात आहे. निधी उपलब्ध हाेताच संबंधित पात्र लाभार्थींना ताे वितरित केला जाईल.

-अतुल जगताप, समाजकल्याण निरीक्षक.

Web Title: 85 ZPs who cross the caste threshold are deprived of 'Kanyadana'