२६ गावे राहिली रात्रभर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:41+5:302021-07-07T04:40:41+5:30
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुडकडे जाणाऱ्या महावितरणच्या उच्चविद्युत वाहिनीवर वीज पडल्याने तब्बल २६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. ...

२६ गावे राहिली रात्रभर अंधारात
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुडकडे जाणाऱ्या महावितरणच्या उच्चविद्युत वाहिनीवर वीज पडल्याने तब्बल २६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे ही गावे रात्रभर अंधारात राहिली. मात्र महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रभर तब्बल दहा तास भरपावसात पेट्रोलिंग करीत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला.
सोमवारी पाथरुडसह परिसरात सायंकाळी पावसास सुरुवात झाली. यादरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास महावितरणच्या उच्च विद्युत वाहिनीवर वीज पडल्याने पाथरुडसह आंबी उपकेंद्राचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. यामुळे या उपकेंद्रांवर अवलंबून असलेली २६ गावे अंधारात बुडाली. त्यातच रात्रभर पाऊस पडत असल्याने विद्युत बिघाडाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर होते. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता विशाल बागुल, कर्मचारी संतोष सानप, बी. जी. खंडागळे, चंद्रकांत आकरे, स्वप्निल टकले, चौथवे, स्वामी, हुरकुडे आदींनी रात्री सहा ते पहाटे पाच असे जवळपास १० तास पेट्रोलिंग करीत जवळपास नऊ ठिकाणचे इन्सुलेटर बदलले. यामुळे पहाटे पाच वाजता भूमवरून पाथरुडकडे जाणाऱ्या उच्च विद्युतवाहिनीवरील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले.