साताऱ्याजवळ जुन्या वादातून दांडक्याने मारुन तरुणाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

By नितीन काळेल | Updated: May 30, 2025 18:21 IST2025-05-30T18:21:42+5:302025-05-30T18:21:42+5:30

कोडोलीतील प्रकार; शहर ठाण्यात नोंद, जुन्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय माने याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली 

Youth beaten to death over old dispute near Satara; Three in police custody | साताऱ्याजवळ जुन्या वादातून दांडक्याने मारुन तरुणाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

साताऱ्याजवळ जुन्या वादातून दांडक्याने मारुन तरुणाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

नितीन काळेल 

सातारा : सातारा शहराजवळील कोडोली येथे जुन्या भांडणाच्या कारणातून लाकडी दांडक्याने मारहाण करुन एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी तिघाजणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तर या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या मारहाणीत अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) याचा खून झाला आहे. तर याप्रकरणी तरुणाची बहीण दीपाली जितेंद्र केंजळे (रा. कवठे, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी धनंजय यादव (पूर्ण नाव नाही), प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि अन्य एकजण (सर्व रा. कोडोली, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. २९ मे रोजी दुपारपासून रात्री ११ वाजेच्या दरम्यान हा प्रकार कोडोलीतील पाच एकराचा प्लाॅट येथे घडली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय माने याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. डोके, पाठ, हात, पायावर दांडके मारण्यात आले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अक्षय याचा मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी शोध घेऊन तिघां संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर सातारा शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे.

Web Title: Youth beaten to death over old dispute near Satara; Three in police custody