अनधिकृत झोपडीच्या विक्रीतून नवी मुंबईत तुंबळ हाणामारी, एपीएमसी आवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:04 IST2021-09-21T13:03:29+5:302021-09-21T13:04:00+5:30
अनेकदा एकाच झोपडपट्टीवर सातत्याने कारवाई करूनही त्याठिकाणी पुन्हा झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यावरूनही दोन्ही प्रशासनाचे अतिक्रमण विरोधी मोहिमेतील अपयश समोर येत आहे.

अनधिकृत झोपडीच्या विक्रीतून नवी मुंबईत तुंबळ हाणामारी, एपीएमसी आवारातील घटना
सूर्यकांत वाघमारे -
नवी मुंबई : शहरात सर्रासपणे अनधिकृत झोपड्या उभारून त्याची लाखोंना विक्री होताना दिसत आहे. मात्र, मोकळ्या भूखंडांवरील झोपड्या हटवण्यात सिडको व पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या उदासीनतेमुळे शहरात जागोजागी झोपडपट्टी दादा तयार झाले आहेत. अशाच प्रकारातून एपीएमसी आवारात झोपडी विकण्यावरून झालेल्या वादात दोन गटांत हाणामारीची घटना घडली आहे.
एपीएमसी आवारातील (तुर्भे) सेक्टर १९ येथील अनधिकृत झोपडी विकण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांत जबर हाणामारीची घटना घडली. त्यात एकाच्या हत्येच्या उद्देशाने वार करण्यात आले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एपीएमसी आवारातील ग्रीन पार्क हॉटेल लगतच्या मोकळ्या भूखंडावरील झोपड्या ८० हजार ते १ लाख रुपयांना विकल्या जात आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या इब्रान खान याने त्याची एक झोपडी मानखुर्द येथे राहणाऱ्या आतिकुर शेख याला ८० हजार रुपयांना विकली होती. त्यानुसार आतिकुर याने झोपडीची डागडुजी केली होती. ही झोपडी इब्रान याने काही दिवसांसाठी वापराकरिता मागितली होती. परंतु, आपण पत्नीसह त्याठिकाणी राहायला येणार असल्याचे सांगून त्याने त्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यातून शनिवारी संध्याकाळी आतिकुर शेख हा साथीदारांसह ग्रीन पार्क हॉटेललगतच्या झोपड्पट्टीमध्ये आला होता. यावेळी आतिकुर व इब्रान यांच्या गटात जबर हाणामारी झाली. त्यात आतिकुर जखमी झाला आहे.
कारवाईनंतरही पुन्हा उभारल्या जातात झोपड्या
- या घटनेवरून शहरात सर्रासपणे अनधिकृत झोपड्या उभारून त्याची विक्री होताना दिसत आहे. मात्र, शहर झोपडपट्टी मुक्त करण्यात सिडको व पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे.
- अनेकदा एकाच झोपडपट्टीवर सातत्याने कारवाई करूनही त्याठिकाणी पुन्हा झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यावरूनही दोन्ही प्रशासनाचे अतिक्रमण विरोधी मोहिमेतील अपयश समोर येत आहे.