Video: Bundles of currency notes were thrown from a building at kolkata during DRI Raid | Video: धाड पडली अन् काचेच्या इमारतीमधून नोटांच्या थप्प्यांची बरसात झाली
Video: धाड पडली अन् काचेच्या इमारतीमधून नोटांच्या थप्प्यांची बरसात झाली

कोलकाता : नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झालेली असली तरीही त्यामागचा काळा पैसा नष्ट करण्याचा मूळ उद्देश सफल झालेला दिसत नाही. आयकर विभाग, महसूल विभाग विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत. या छाप्यांमध्ये करोडोंची संपत्ती उघड होत आहे. कोलकात्यात एक असाच प्रकार घडला आहे. छाप्यावेळी एका गगनचुंबी इमारतीवरून चक्क नोटांच्या बंडलांचा पाऊस पहायला मिळाला. 


प्राप्तिकर विभागासह अन्य यंत्रणांनी विविध व्यक्ती, कंपन्या तसेच संस्थांवर घातलेल्या छाप्यांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या नोटा साठवल्या जात असून, त्या चलनातून बाद करण्यात याव्यात, अशी मागणी होत असताना, धाडींमध्येही त्या सापडत नसल्याने त्या गेल्या कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा आणल्या. त्यावेळी 500 व 1000 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या जातात आणि त्यातून काळ्या पैशाचा उगम होतो, असे सांगिते होते. पण आता छाप्यांमध्ये मोठ्या मूल्याच्या नोटा आढळून येत नसल्याने आणि चलनातही त्यांचा वापर कमी होत आहे.


कोलकात्यामध्ये काल महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी काल होक मर्कंटाईल प्रा. लि. या कंपनीच्या पॉश इमारतीतील कार्यालयावर छापा मारला. बेंटींक स्ट्रीटवर हे कार्यालय आहे. छापा पडल्याचे कळताच ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी इमारतीची सहाव्या मजल्यावरील काच फोडून नोटांच्या बंडलांच्या थप्प्याच खाली फेकायला सुरूवात केली. हे पाहून तेथील सुरक्षारक्षक आणि उपस्थितांनी गोळा करायला सुरूवात केली. ही रक्कम महसूल संचालनालयाने जप्त केली की नाही या बाबत समजले नसले तरीही या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर कमालीचा व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ एका दुकानदाराने रेकॉर्ड केला होता.

Web Title: Video: Bundles of currency notes were thrown from a building at kolkata during DRI Raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.