भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:03 IST2026-01-02T14:03:07+5:302026-01-02T14:03:49+5:30
एका भाजपा नगरसेवकाच्या मुलाने आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने ठिकठिकाणी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी वाराणसी पोलिसांवर सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी होती. मात्र याच दरम्यान वाराणसीमध्ये एक अशी घटना घडली जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वाराणसीतील एका भाजपा नगरसेवकाच्या मुलाने आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.
बाईक नेण्यावरून झाला होता वाद
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणिकर्णिका घाट गेटजवळ भाजपा नगरसेवकाचा मुलगा हिमांशु श्रीवास्तव याला तिथे तैनात असलेले चौकी प्रभारी अभिषेक त्रिपाठी यांनी बाईकसह येण्या-जाण्यास मनाई केली. वास्तविक हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे आणि विशेष दिवसांमध्ये येथे पायी चालणं देखील कठीण असतं.
स्थानिक नागरिकांनी केली हिमांशुची धुलाई
वाहतुकीच्या कारणावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की, हिमांशुने थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी तीव्र आक्षेप घेतला. हिमांशुसोबत त्याचे काही मित्रही होते. या तरुणांचा उद्धटपणा आणि दादागिरी पाहून संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी हिमांशुची चांगलीच धुलाई केली. या मारहाणीनंतर हिमांशुला उपचारासाठी मंडलीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
पोलीस उपनिरीक्षक अभिषेक त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून हिमांशु श्रीवास्तव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, या घटनेत सहभागी असलेल्या इतर तरुणांचीही ओळख पटवली जात असून त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.