गाझियाबादमध्ये विचित्र घटना; बदला घेण्यासाठी गर्भवती म्हशीवर केले चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 00:30 IST2022-06-13T00:29:33+5:302022-06-13T00:30:33+5:30
शुक्रवारी जेव्हा प्रमोद आपल्या म्हशीला चारा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना त्यांची म्हैस रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती अक्षरशः तडफडत होती.

गाझियाबादमध्ये विचित्र घटना; बदला घेण्यासाठी गर्भवती म्हशीवर केले चाकूने वार
उत्तर प्रदेशातील गाझीबादच्या मुरादनगरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे बदला घेण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या म्हशीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने ज्या म्हशीवर हल्ला केला, ती म्हैस गर्भवती होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.
ही घटना गाझियाबादमधील मुरादनगर भागातील रावली कला गावातील आहे. येथे प्रमोद कुमार आपल्या कुटुंबासह राहतात. ते शेती आणि पशुपालन करून आपला घरखर्च चालवतात. दोन दिवसांपूर्वी त्यांची म्हैस चरणजित सिंग यांच्या घरात बांधलेली होती. शुक्रवारी जेव्हा प्रमोद आपल्या म्हशीला चारा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना त्यांची म्हैस रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती अक्षरशः तडफडत होती.
गर्भवती होती जखमी म्हैस -
या गर्भवती म्हशीच्या पोटात अनेक वार करण्यात आले होते. प्रमोद कुमार यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर, पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली. यात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना दीपक कुमार नावाची व्यक्ती त्या वेळेत म्हशीजवळ जाताना दिसली.
बदला घेण्यासाठी केले कृत्य -
पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आठवडाभरापूर्वी प्रमोदसोबत भांडण झाले होते. यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी आपण म्हशीवर चाकूने वार केल्याचे दीपकने पोलिसांना सांगितले.