Two accused killed in Hyderabad encounter was minor? Family Claims | हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेले दोन आरोपी अल्पवयीन? कुटुंबीयांचा दावा 
हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेले दोन आरोपी अल्पवयीन? कुटुंबीयांचा दावा 

हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. दरम्यान, या  चकमकीवरून वाद निर्माण झाला असून, ठार झालेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या कुटुंबीयांनी या आरोपींबाबत धक्कादायक दावा केला आहे. चकमकीमध्ये ठार झालेल्या आरोपींपैकी दोघे जण हे अल्पवयीन होते, असा दावा आरोपींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर केला आहे. तसेच या सर्वांना खोट्या चमककीत ठार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हैदराबाद बलात्कारकांडातील आरोपींच्या चकमकीवरून वादाला तोंड फुटल्यानंतर या चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. 
 चकमकीत ठार करण्यात आलेले हैदराबादमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे नारायणपेट जिल्ह्यातील गुडगंडला आणि जकलैर गावातील रहिवासी होते. या आरोपींपैकी नवीन याच्या आईने सांगितले की, ''नवीन हा माझा एकुलता एक मुलगा होता. त्याला ठार करण्यात आले तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता. त्याचा जन्म 2002 मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याने शाळा सोडली होती. तो जिथे शिकत होता, त्या चिन्ना पोरमा शाळेतील त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आम्हाला लवकरच मिळेल.''

दरम्यान, या प्रकरणातील अजून एक आरोपी शिवा याचे वडील जे. रंजना यांनी मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडताना चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझा मुलगा हत्यारबंद पोलिसांच्या पहाऱ्यातून कसा काय पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो? त्याला खोट्या चकमकीत मारले गेले. जर माझ्या मुलाने अपराध केलाही असेल तर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या हवाली केले पाहिजे होते.''  तसेच रंजना यांनीही आपला मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा केला. अन्य दोन आरोपी असलेल्या चेन्नाकेशवुलू आणि मोहम्मद आरिफ यांच्या वडिलांनीही मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मुलांना खोट्या चकमकीत मारण्यात आल्याची शंका व्यक्त केली. 

 हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर  केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. अधिक तपासासाठी आरोपींना घटनास्थळी  नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून या आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला. 

Web Title: Two accused killed in Hyderabad encounter was minor? Family Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.