Threatening throw acid and beaten young women ; Incidents in the pashan | तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना

तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना

पुणे : तू माझा फोन का उचलत नाही, असे म्हणून तरुणीला भररस्त्यात अडवून मारहाण करुन तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार पाषाण परिसरात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अक्षय पवार(रा. सुस, ता़ मुळशी) याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पाषाण येथे राहणार्‍या एका १८ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची मैत्रिण आणि अक्षय हे दोघे मित्र आहेत. त्यातून या तरुणीशी त्याच्याशी तोंडओळख झाली आहे. यापूर्वीही अक्षय याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. ही तरुणी १ जून रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरुन जात असताना अक्षय पवार हा रिक्षातून आला व त्याने या तरुणीला भररस्त्यात अडविले. 'तू माझे फोन का उचलत नाही ' , असे म्हणत तिच्या कानशिलात मारली. तसेच तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला त्याने यापुढे कुठे दिसली तरअंगावर अ‍ॅसिड फेकेन अशी धमकी दिली. याप्रकाराने घाबरलेल्या या तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत अक्षय पवार याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी अक्षय पवार याचा शोध घेतला. तर तो पळून गेलाअसल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Threatening throw acid and beaten young women ; Incidents in the pashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.