'तू आवडली' म्हणत मंगळसूत्र घालायला गेला, तरुणीनं चांगलाच चोपला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:34 PM2022-01-22T13:34:34+5:302022-01-22T13:35:20+5:30

माथेफिरू पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर त्याला तरूणीसह काही नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले...

The molestation of a young woman by a rabid youth, the citizens along with the young woman were beaten in jalgaon | 'तू आवडली' म्हणत मंगळसूत्र घालायला गेला, तरुणीनं चांगलाच चोपला!

'तू आवडली' म्हणत मंगळसूत्र घालायला गेला, तरुणीनं चांगलाच चोपला!

Next

जळगाव- गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर परिसरात एका माथेफिरूने, एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात घुसून, तेथे काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीच्या गळ्यात बळजबरीने मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही, तर या माथेफिरूला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने कार्यालयातील वस्तूंचीही तोडफोड केली. दरम्यान, तरूणीसह नागरिकांनीही त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले.

गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात काही तरुण-तरुणी काम करतात. अभय सोनवणे हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीच्या मागे फिरत आहे. तरुणीने त्यास वारंवार समजावल्यानंतरही तरुण ऐकत नसल्याने तरुणीने याबाबत पोलिसातदेखील कळविले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास माथेफिरू तरुण थेट कार्यालयात घुसला आणि काव्या (नाव बदललेले) आहे का? अशी विचारणा करीत दुसऱ्याच एका तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधू लागला. तरुणीने आरडाओरड करताच इतरांनी त्यास बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला विरोध होत असल्याचे पाहून माथेफिरू तरुणाने कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करीत काढता पाया घेतला.

पोलिसांनी घेतले ताब्यात -
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत शहर पोलिसांना कळविले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माथेफिरू तरुणाचा परिसरात शोध घेतला असता तो सापडला. त्या तरुणाला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, माथेफिरू पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर त्याला तरूणीसह काही नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्याने पोलिसांना अभय सोनवणे असे नाव सांगितले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Web Title: The molestation of a young woman by a rabid youth, the citizens along with the young woman were beaten in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app