चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:23 IST2026-01-14T11:22:50+5:302026-01-14T11:23:50+5:30
मंदिरात चोरी केल्यानंतर देवासमोर हात जोडून माफी मागणाऱ्या चोराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
मंदिरात चोरी केल्यानंतर देवासमोर हात जोडून माफी मागणाऱ्या चोराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या गरौठा परिसरात एका मंदिरात ही चोरी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून येतं की, चोरी केल्यानंतर हा चोर भावूक झाला आणि त्याने दोन वेळा हात जोडून देवाकडे माफी मागितली.
११ जानेवारी २०२६ च्या रात्री ही घटना घडली. गरौठा क्षेत्रातील मढां रोडवर असलेल्या एका मंदिरात चोराने रात्री कुलूप तोडून प्रवेश केला. त्याने देवीच्या मूर्तीवरील मौल्यवान दागिने चोरले. सकाळी जेव्हा भाविक पूजेसाठी आले, तेव्हा त्यांना मंदिराचं कुलूप तुटलेलं आणि सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं. मंदिराचे पुजारी हरिश्चंद्र पटेल यांनी तातडीने गरौठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना
तपासादरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेलं. फुटेजमध्ये एक तरुण निळ्या रंगाची हुडी आणि डोक्यावर टोपी घालून दिसला. आरोपी मंदिरात प्रवेश करतो, मूर्तींजवळ जाऊन शोध घेतो आणि मूर्तीवर असलेले कपडे हटवून त्याखालील दागिने चोरतो. विशेष म्हणजे चोरी करून बाहेर पडताना आरोपी दोन वेळा देवाकडे हात जोडून माफी मागताना दिसतो. हेच फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
असा लागला चोराचा सुगावा
घटनेनंतर पोलीस पथकाने स्थानिक स्तरावर चौकशी केली आणि खबऱ्यांचं नेटवर्क एक्टिव्ह केलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. याच दरम्यान लखेरी नदीच्या पुलाजवळील जंगलात एक संशयित तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शिवमंदिराजवळून आरोपीला अटक केली.
धमवीर सिंह असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले दागिने जप्त केले आहेत. आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. मंदिरात चोरी आणि त्यानंतर देवासमोर हात जोडण्याची ही कृती सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.