धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:51 IST2019-08-16T16:48:03+5:302019-08-16T16:51:34+5:30
आरोपी राहुलला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली

धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग
मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सवर चालण्यासाठी येणाऱ्या १६ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी राहुल परदेशी या फ्री लान्सर प्रशिक्षकाला अटक केली आहे. वजन कमी करण्यासाठी पीडित तरुणी महालक्ष्मी रेसकोर्सवर चालण्यासाठी येत असताना राहूलने तिच्याशी लगट करून अश्लील स्पर्श केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. आरोपी राहुलला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फिरोझ बागवान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. राहुल हा फ्री लान्सर प्रशिक्षक असून तो या ठिकाणी येणाऱ्यांना व्यायाम शिकवत असल्याचे समोर आले आहे.
सातरस्ता परिसरात राहणारी तरुणी नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली. ती गेल्या आठवड्यापासून दररोज चालण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवर येत असे. काही दिवसांपासून पाठलाग करून राहुलने काही ना काही कारणं सांगून तिच्याशी बतावणी मारून तू वजन कमी करण्यासाठी करत असलेले व्यायामाचे प्रकार चुकीचे आहेत. तुझी चालण्याची पद्धत देखील चुकीचे असल्याचे सांगून राहुलने व्यायामाचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा केला. त्याच बहाण्याने त्याने या मुलीच्या अंगाला अनेक ठिकाणी अश्लील स्पर्श केला. तिने हा प्रकार घरी सांगितल्यावर कुटुंबीयांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक फिरोझ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेकवडे आणि बजरंग जगताप यांच्या पथकाने दोन दिवसांच्या सलग तपासानंतर राहुल याला शोधून काढले.