एकतर्फी प्रेमातून संतापजनक कृत्य, महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये लावला 'स्पाय कॅमेरा' आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:15 IST2026-03-21T19:13:29+5:302026-03-21T19:15:25+5:30
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना गुजरातच्या राजकोट शहरातून समोर आली.

एकतर्फी प्रेमातून संतापजनक कृत्य, महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये लावला 'स्पाय कॅमेरा' आणि मग...
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना गुजरातच्या राजकोट शहरातून समोर आली. एका डॉक्टरने आपल्याच सहकारी महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरून 'स्पाय कॅमेरा' बसवून तिचे ३ हजारांहून अधिक खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टरसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, पीडित महिला डॉक्टरचे दुसऱ्या एका पुरुष डॉक्टरासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजताच आरोपीने सूड भावनेने हे कृत्य केले. पीडितेची बदनामी करणे आणि तिच्याकडून पैसे उकळणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
आरोपीने केवळ व्हिडिओ रेकॉर्ड केले नाहीत, तर त्या आधारे पीडितेचा मानसिक छळ सुरू केला. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिला डॉक्टरने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपीची चौकशी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. आरोपीने पीडितेच्या नकळत तिच्या क्लिनिकमध्ये स्पाय कॅमेरे बसवून तब्बल ३,००० पेक्षा जास्त व्हिडिओ रेकॉर्ड केले होते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "पीडित महिला डॉक्टरला सातत्याने त्रास दिला जात होता. प्राथमिक पुराव्यांची खातरजमा केल्यानंतर आम्ही भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल."
या घटनेमुळे राजकोटसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सुशिक्षित वर्गाकडून घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील इतर ११ आरोपींचा आणि या कृत्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास करत आहेत.