वरळीतील धक्कादायक घटना; दोन बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:52 IST2021-11-11T21:51:56+5:302021-11-11T21:52:32+5:30
Accident Case : गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरळीतील धक्कादायक घटना; दोन बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई - वरळी गाव बस आगारामध्ये दोन बेस्टच्या बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगारामध्ये बस नेत असताना चढणावरून बस खाली उतरल्यामुळे ही मुलगी दोन बसच्यामध्ये चिरडली गेली आणि रक्तबंबाळ झाली. प्रीती कोरी असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी एका बेस्टच्या बस चालकाला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रीती कोरी ही मुलगी वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असून मैत्रीणीसोबत ट्युशनला गेली होती. त्यावेळी तिची मैत्रीण मागे राहिली आणि मुलगी फोनवर बोलत पुढे आली होती. त्याचवेळी आगारामध्ये एक बेस्टची बस आत जात होती. तर दुसरी बस मागे उभी होती. अचानक पुढील बस चढणावरून मागेच्या बाजूने खाली उतरल्यामुळे दोन बसमध्ये ही मुलगी चिरडली गेली.
रक्तबंबाळ अवस्थेत जखमी मुलीला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३०४(अ) आणि निष्काळजीपणे बस चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. बसचालक गौतम सिद्धार्थ भालेराव(३०) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. तो घाटकोपर येथील रहिवासी आहे.