Satara Crime: निवृत्त पोलिसाला घरातच ११ दिवस ठेवले डिजिटल अरेस्ट, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:41 IST2025-10-03T14:40:30+5:302025-10-03T14:41:17+5:30
Satara Cyber Crime News: अकाउंटमध्ये इंटरनॅशनल फंडिंग आल्याचे भासवून पाच लाख उकळले

संग्रहित छाया
सातारा : एका वयोवृद्ध सेवानिवृत्त पोलिसाला घरात अकरा दिवस डिजिटल अरेस्ट करून तब्बल ५ लाख ३५ हजारांना गंडा घालण्यात आला. या प्रकारानंतर संबंधिताने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा सारा प्रकार २ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला.
सातारा शहराला लागून असलेल्या एका गावात संबंधित ७४ वर्षीय सेवानिवृत्त पोलिस वास्तव्य करीत आहेत. २ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. कुलाबा पोलिस स्टेशन येथील सीबीआय पोलिस असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या मोबाइलवर व्हिडीओ काॅल आला. या काॅलमध्ये गणवेशात आयपीएस अधिकारी त्यांना दिसले. त्यांनी ‘तुमच्या अकाउंटमध्ये इंटरनॅशनल फंडिंग झाले आहे. त्यामुळे चाैकशी होईपर्यंत तुम्हाला आम्ही अरेस्ट करीत आहोत,’ असे सांगितले.
यावर संबंधित वयोवृद्ध पोलिसाने त्यांना माझे एकच बँक अकाउंट आहे, असे उत्तर दिले. परंतु तोतया सीबीआय ऑफिसरने त्यांना आंध्र प्रदेशमधूनही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले दिसत आहे. हे तुम्हाला मिटवायचे असेल तर आम्ही सांगेल तसे करा, अो सांगितले. या प्रकारामुळे ते भयभीत झाले. त्यांनी कोणालाही याची माहिती दिली नाही. घरात तब्बल ११ दिवस ते डिजिटल अरेस्टमध्ये होते.
यादरम्यान, त्यांना गुगलपेवर वेळोवेळी रक्कम पाठविण्यास सांगून त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजार ५९९ रुपये संबंधित तोतया अधिकाऱ्याने उकळले. काही दिवसांनंतर त्यांना आपण फसलो गेलो, याची जाणीव संबंधीत निवृत्त पोलिसाला झाली. अखेर ३० सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे अधिक तपास करीत आहेत.
यामुळे बसला ‘त्यांचा’ विश्वास
व्हिडीओ काॅलमध्ये आयपीएस अधिकारी दिसल्याने त्यांचा विश्वास बसला. परंतु आपण फसल्याचा त्यांना पश्चाताप होतोय. हा प्रकार त्यांनी कुटुंबात कोणालाही सांगितला नाही. पोलिस दलातून निवृत्त होऊन त्यांना बरीच वर्ष झाली आहेत. त्यांच्यासाठी हा नवा फ्राॅड होता. त्यातच त्यांचे वय झाल्यामुळे त्यांच्या हातून हे घडलं, असे पोलिस सांगताहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी असाच प्रकार कऱ्हाड येथे घडला होता.