"खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या"; बँकेच्या जाचक अटीमुळे हताश भावाने बहिणीचा सांगाडाच टेबलावर ठेवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:49 IST2026-04-28T12:48:30+5:302026-04-28T12:49:33+5:30
मृत बहिणीचे पैसे मिळवण्यासाठी भावाने तिचे सांगाडा नेला बँकेत; ओडिशामधील मन सुन्न करणारी घटना

"खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या"; बँकेच्या जाचक अटीमुळे हताश भावाने बहिणीचा सांगाडाच टेबलावर ठेवला!
Odisha Crime: बँकेच्या जाचक अटी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे एका भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँक गाठावी लागल्याची हृदयद्रावक घटना ओडिशात घडली. खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या असे बँकेने वारंवार सांगितल्यामुळे भावाने चक्क बहिणीची थडगे खोदून तिचे अवशेष बँकेत सादर केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिलानाली गावातील जीतू मुंडा (५०) यांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले होते. कालरा यांच्या बँक खात्यात २०,००० रुपये जमा होते. जीतू यांच्यासाठी ही रक्कम जगण्याचा मोठा आधार होती. बहिणीच्या निधनानंतर हे पैसे काढण्यासाठी जीतू गेल्या अनेक दिवसांपासून ओडिसा ग्रामीण बँकेच्या मल्लिपसी शाखेत चकरा मारत होते.
बँकेचा अजब अट्टाहास आणि जीतूचा टोकाचा निर्णय
जीतू यांनी बँकेला बहिणीच्या निधनाची माहिती दिली होती. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक नियमांवर बोट ठेवत पैसे हवे असतील तर खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या, असे वारंवार सांगितले. जीतू हे अशिक्षित आहेत. त्यांना मृत्यू दाखला किंवा वारसदार नोंदणी यांसारख्या कायदेशीर प्रक्रियांची माहिती नव्हती.
बँकेच्या वारंवार सांगण्यालाच अंतिम आदेश मानून हताश झालेल्या जीतू यांनी एक भयानक पाऊल उचलले. त्यांनी स्मशानभूमीत जाऊन बहिणीचे थडगे खोदले आणि तिचा सांगाडा बाहेर काढला. तो सांगाडा एका कपड्यात गुंडाळून, रखरखत्या उन्हात ३ किलोमीटर पायपीट करत जीतू थेट बँकेत पोहोचले आणि त्यांनी तो सांगाडा बँकेच्या टेबलावर ठेवला.
A tribal man was seen carrying his deceased sister's skeleton to the bank to withdraw money from her account, claiming to be her heir, in Odisha's Keonjhar district, on April 27.
— ANI (@ANI) April 28, 2026
On the incident, Uma Shankar Dalai, Sub Collector, Keonjhar, said, "The tribal man was not aware of… pic.twitter.com/oe5l3xE8Yo
बँकेत उडाली खळबळ
बँकेच्या आवारात मानवी सांगाडा पाहताच कर्मचारी आणि ग्राहकांची एकच पळापळ झाली. घाबरलेल्या बँक व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना बोलवलं. मी वारंवार विनंती करूनही तुम्ही तिला घेऊन यायला सांगितले, म्हणून मी आज तिला घेऊन आलो आहे," असे उत्तर जीतू यांनी पोलिसांना दिले.
पोलीस आणि प्रशासनाची मध्यस्थी
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जीतू मुंडा यांची समजूत काढली. पोलिसांनी सांगितले की,"जीतू हा पूर्णपणे अशिक्षित असून त्याला वारसदार किंवा कायदेशीर प्रक्रियेचे ज्ञान नाही. बँकेनेही त्याला प्रक्रिया समजावून सांगण्यात दिरंगाई केली."
प्रशासनाने आता या प्रकरणात हस्तक्षेप केला असून, जीतू यांना त्यांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सन्मानाने तो सांगाडा पुन्हा पुरला.