खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:55 IST2025-10-19T10:54:26+5:302025-10-19T10:55:10+5:30
पोलिसांनी एका कापड व्यापाऱ्याच्या घरातून ३० लाख रुपयांच्या चोरीचा गुन्ह्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

फोटो - आजतक
मेरठ पोलिसांनी एका कापड व्यापाऱ्याच्या घरातून ३० लाख रुपयांच्या चोरीचा गुन्ह्याबाबत मोठा खुलासा केला आहे. व्यापाऱ्याची पत्नीच या चोरीमागील सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं. आपल्या भावाच्या किडनीच्या उपचारावर खर्च करण्यासाठी तिने ही चोरी केली. पोलिसांनी व्यापाऱ्याची पत्नी, सासू, मेहुणी आणि मेहुण्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी टीपी नगर पोलीस स्टेशन परिसरातील महावीर जी नगर येथील कापड व्यापारी पीयूष मित्तल यांच्या घरी चोरी झाली. ५०,००० रुपये रोख आणि सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासात असं दिसून आलं की व्यापाऱ्याचा मेहुणा रवी बंसल (३६), दीपक (२४), अनिता (५३), पूजा (३२) यांनी चोरीचा कट रचला होता.
चौकशीदरम्यान, पत्नी पूजानेच चोरीचा प्लॅन केल्याचं समोर आलं. पूजाची आई अनिता देखील या प्लॅनमध्ये सहभागी होती, कारण पूजाचा भाऊ रवी याची किडनी फेल झाली होती आणि उपचारासाठी पैसे नव्हते. प्लॅननुसार, घटनेच्या दिवशी, व्यापारी पीयूषची पत्नी पूजा मेरठमधील पीव्हीएस मॉलमध्ये पीयूषला शॉपिंगसाठी घेऊन गेली. तिने तिचा भाऊ रवीलाही घटनेची माहिती दिली होती.
पूजाने भावाला सांगितलं की, तिने चाव्या कुठे ठेवल्या आहेत. त्याच दिवशी दुपारी २:३० वाजता, पीयूषचा मेहुणा रवी आणि रवीचा मेहुणा दीपक हे स्विफ्ट कारने दिल्लीतील मयूर विहार येथून निघाले आणि दुपारी ३:३६ वाजता टीपी नगर येथे पोहोचले. त्यानंतर दीपक ई-रिक्षाने घरी पोहोचला. पूजाने आधीच दरवाजा लॉक केला होता.
दीपक घरात शिरला, घराच्या लॉकरमधून ५०,००० रुपये रोख आणि दागिने घेतले. चौकशीत असं दिसून आलं की, पूजाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पूजाने सहा महिन्यांपूर्वी पीयूषशी दुसरं लग्न केलं होतं, तर पीयूषचे हे तिसरं लग्न होतं. पोलीस सध्या या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.