प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:23 IST2026-01-08T09:22:31+5:302026-01-08T09:23:29+5:30
तब्बल ११ महिन्यांपूर्वी झालेल्या एका ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून, या हत्येचा मास्टरमाईंड स्वतः सख्खा मेहुणाच असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून...
'प्रेम हे आंधळं असतं' असं म्हटलं जातं, पण तेच प्रेम जेव्हा अनैतिक वाटेवर जातं, तेव्हा त्याचा अंत किती भयानक असू शकतो, याचा प्रत्यय रांचीमध्ये आला आहे. एका तरुणाला आपल्याच मेहुण्याच्या पत्नीशी सूत जुळवणं चांगलंच महागात पडलं. तब्बल ११ महिन्यांपूर्वी झालेल्या एका ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून, या हत्येचा मास्टरमाईंड स्वतः सख्खा मेहुणाच असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
रेल्वे अपघाताचा बनाव फसला
१० फेब्रुवारी २०२५ रोजी अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक नगर गेट क्रमांक १ जवळील रेल्वे ट्रॅकच्या कडेला झुडपात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. सुरुवातीला हा रेल्वे अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. तब्बल ११ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर या हत्येमागचं सत्य बाहेर आलं आहे. संजय उरांव असे मृताचे नाव असून त्याची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती.
काय होतं हत्येचं कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक संजय उरांव याचे त्याचे मेहुणे विनोद उरांव याची पत्नी राजमणि देवी हिच्याशी प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांची कुणकुण विनोदला लागली होती, ज्यामुळे त्यांच्या घरात सतत वाद होत होते. आपल्याच घरात सुरू असलेला हा खेळ संपवण्यासाठी विनोदने टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या पत्नीलाच सोबत घेऊन जीजाच्या हत्येचा कट रचला.
फसवून रांचीला बोलावलं अन्...
ठरल्याप्रमाणे विनोदने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने संजयला गुमला येथून फसवून रांचीला आणले. रात्रीच्या वेळी त्याला रेल्वे ट्रॅकजवळ नेण्यात आले, तिथे आरोपींनी संजयवर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला जेणेकरून लोकांना तो अपघात वाटेल.
रांची पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी विनोद उरांव, त्याची पत्नी राजमणि देवी, अमरदीप खालखो आणि अनुप उरांव यांचा समावेश आहे. हे सर्वजण गुमला जिल्ह्यातील बिशुनपूर येथील रहिवासी आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.