लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:27 IST2025-11-26T13:26:12+5:302025-11-26T13:27:06+5:30
गोमती नगर परिसरात १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, मृत तरुणीच्या भावाने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप केला आहे.

लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ पुन्हा एकदा एका गंभीर गुन्ह्याच्या घटनेमुळे हादरली आहे. गोमती नगर परिसरात १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, मृत तरुणीच्या भावाने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर थेट हत्येचा गंभीर आरोप केला आहे. घटनेनंतर तरुणीचा पार्टनर फरार झाला असून, त्याचा मोबाईलही बंद येत आहे. या प्रकरणी पोलीस आता पोस्टमॉर्टम रिपोर्टची आणि कुटुंबीयांच्या तक्रारीची वाट पाहत आहेत.
रायबरेली जिल्ह्यातील गदागंज मंडी भागातील रहिवासी असलेली १९ वर्षीय अफसरी बानो हिचा लखनऊच्या गोमती नगर भागात संशयास्पद मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अफसरी तिच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत लखनऊमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होती. अफसरीचा भाऊ रईस याने तिच्या लिव्ह-इन पार्टनरनेच तिची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तरुणीचा मृतदेह रुग्णालयात टाकून तो फरार झाला असून, शनिवारपासून त्याचा मोबाईल बंद आहे. या घटनेमुळे लखनऊ पोलिसांचीही धावपळ उडाली आहे.
नेमकी घटना काय घडली?
अफसरी बानो सुमारे दोन महिन्यांपूर्वी रायबरेलीतीलच एका युवकासोबत घर सोडून लखनऊला आली होती. गोमती नगरच्या विभूति खंड परिसरात भाड्यावर खोली घेऊन ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटुंबासोबत तिचे फोनवरून बोलणे सुरू होते.
रईसने दिलेल्या माहितीनुसार, "शनिवारी रात्री आम्हाला त्या मुलाचा फोन आला की अफसरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे." यानंतर त्याने अफसरीला लोहिया रुग्णालयात नेले आणि तिथे तिचा मृतदेह सोडून तो पसार झाला. आम्ही जेव्हा रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा बहिणीचा मृत्यू झाला होता, असे रईसने सांगितले. मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र न मिळाल्याने विभूति खंड पोलिसांनी तिचा मृतदेह अज्ञात महिला म्हणून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता.
त्यानेच माझ्या बहिणीला मारले!
मंगळवारी रईस पोस्टमॉर्टम हाऊसवर पोहोचले आणि त्यांनी आपल्या बहिणीची ओळख पटवली. रईस यांनी पोलिसांना सांगितले, "शनिवार रात्रीपासून तो मुलगा फरार आहे आणि त्याचा फोनही बंद आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यानेच आमच्या बहिणीची हत्या केली आहे. आम्ही लवकरच पोलिसांत लेखी तक्रार देऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार आहोत." अफसरी बानोच्या मृत्यूने आणि तिच्या भावाने केलेल्या हत्येच्या आरोपामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे.
पोलीस म्हणतात...
विभूति खंडचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अमर सिंह यांनी याबाबत माहिती दिली की, "सध्यापर्यंत मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधलेला नाही. तक्रार मिळताच आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट हातात येताच, त्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल."
फरार असलेल्या लिव्ह-इन पार्टनरचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण समोर आल्यानंतरच हे प्रकरण आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट होणार आहे.