कानपूरमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यावर पत्नीने असं काही नाटक केलं की पोलिसांनाही ते खरंच वाटलं. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या हत्येप्रकरणी दोन निष्पाप लोकांना जेलमध्ये पाठवलं. मात्र ७ दिवसांच्या फॉरेन्सिक तपासणी आणि पोलीस तपासानंतर, जे सत्य समोर आलं त्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली.
पत्नीने पतीला मारहाण करून हत्या केल्याचं उघड झालं. कारण तिचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. तिला भाच्यासोबतच राहायचं होतं. पतीच्या हत्येनंतर पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका मुलावर आणि त्याच्या वडिलांवर आरोप करत खूप गोंधळ घातला होता. एवढंच नाही तर महिलेच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी आणि एका पक्षाच्या सदस्यांनीही आंदोलन केलं होतं. आता पोलिसांनी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. तसेच निष्पाप वडील आणि मुलाला जेलमधून सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घरात करण्यात आली हत्या
कानपूरमधील घाटमपूर येथे राहणारे ट्रॅक्टर मालक धीरेंद्रची ११ मे रोजी त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. डोक्यावर एखाद्या कठीण वस्तूने वार करून ही हत्या करण्यात आली. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, धीरेंद्रची पत्नी रीना रडू लागली आणि तिने गोंधळ घातला की तिच्या पतीची हत्या त्याच गावातील कीर्ती यादवने त्याच्या मुलासह केली आहे. या प्रकरणात रीनाने एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही घटनास्थळी बोलावलं, त्यानंतर खूप गोंधळ घातला.
शेजाऱ्यांवर केला आरोप
रीना जागीच रडत होती आणि तिचा पती धीरेंद्रचा ट्रॅक्टरमधील बिघाडावरून कीर्ती यादवशी वाद झाला होता, ज्यामुळे त्यानेच मारहाण केल्याचा आरोप करत होती. पत्नी रीनाने केलेल्या आरोपांनंतर कुटुंबीय आणि पक्षाचे सदस्यही संतापले होते आणि ते मृतदेह नेऊ देत नव्हते. शेवटी पोलिसांना कीर्ती यादव आणि त्याचा मुलगा रवी यांना जेलमध्ये पाठवावं लागलं. पण नंतर तपास केला असता पत्नीनेच बॉयफ्रेंडसाठी पतीची हत्या केल्याचं समोर आलं.