काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:09 IST2026-01-05T15:08:59+5:302026-01-05T15:09:51+5:30
प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची, त्याच्याच पत्नीने आणि पुतण्याने मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील भोगनीपूर कोतवाली अंतर्गत येणाऱ्या अमरौधा गावात घडलेल्या कलीम हत्या प्रकरणाचा पोलिसांनी ८ दिवसांनंतर खळबळजनक खुलासा केला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची, त्याच्याच पत्नीने आणि पुतण्याने मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा बनाव रचला गेला होता, मात्र मोबाईल सीडीआर (CDR) आणि सखोल चौकशीमुळे या प्रकरणातील सत्य बाहेर आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे.
२७ डिसेंबरच्या रात्री ही भयंकर घटना घडली. अमरौधा येथील कटरा परिसरात राहणारे ४२ वर्षीय कलीम यांचा मृतदेह त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. कलीम यांनी गळा कापून आत्महत्या केल्याची माहिती त्यांची पत्नी शमा परवीन हिने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं, ज्यामुळे पोलिसांना संशय आला.
नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
कलीम यांचा भाऊ शकील याने अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगवान केला. कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले असता आणि शमा परवीनची कसून चौकशी केली असता ती डगमगली आणि तिने हत्येचा कट असल्याचं कबूल केलं. रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी या प्रकरणाची पोलखोल झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमा परवीन आणि कलीमचा पुतण्या समर समीम उर्फ चांदबाबू यांच्यात जवळीक वाढली होती, ज्याला कलीमचा सतत विरोध होता. त्यातच मुलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या कर्जावरूनही घरात वाद सुरू होता. २७ डिसेंबरच्या रात्री शेजारी एक कार्यक्रम सुरू होता, याचाच फायदा घेऊन काकी आणि पुतण्याने मिळून कलीमचा गळा चिरून खून केला.
हत्येच्या वेळी चाकू तोडताना चांदबाबूच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. हीच जखम पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरली. जेव्हा पोलिसांनी चांदबाबूला या जखमेबद्दल विचारलं, तेव्हा त्याने आपला गुन्हा मान्य केला. सीओ संजय वर्मा यांनी सांगितलं की, आरोपींच्या माहितीनुसार हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून दोघांनाही न्यायालयात हजर करून जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.