कंगनाचा पाय आणखी खोलात, द्वेष पसरवल्याप्रकरणी तृणमुलकडून तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:19 IST2021-05-07T21:18:03+5:302021-05-07T21:19:07+5:30
Kangana Ranaut : आता या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि, अद्याप अभिनेत्रीला नोटिस दिली आहे की नाही याबाबत माहिती प्राप्त नाही.

कंगनाचा पाय आणखी खोलात, द्वेष पसरवल्याप्रकरणी तृणमुलकडून तक्रार
अभिनेत्री कंगणा राणौत हिच्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये राजकीय द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील वादग्रस्त पोस्टसह नवीन तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रथम तक्रार म्हणून दाखल करण्यात आली होती. आता या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि, अद्याप अभिनेत्रीला नोटिस दिली आहे की नाही याबाबत माहिती प्राप्त नाही.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाची नेता रिजू दत्ता यांच्या द्वारे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पश्चिम बंगालमधील उल्टाडांगा येथे करण्यात आली आहे. रिजू दत्ता यांनी कंगनाविरुद्ध प्रोपोगंडा चालवून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.
रिजू यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कंगनाच्या ट्विटर अकाउंटची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कंगनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचीही संपूर्ण माहिती देत कंगनाने पोस्ट केलेल्या सगळ्या आक्षेपार्ह पोस्ट रिजू यांनी त्यांच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केल्या आहेत. कंगनाने केलेले अनेक आक्षेपार्ह ट्वीट रिजू यांनी पोलिसांसमोर पुरावा म्हणून सादर केले आहेत. तसेच रिजू यांनी कंगनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची समाजातील प्रतिमा मालिन करण्याचा ठपका ठेवला आहे.
वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेन्ड करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ममता यांच्याविरुद्ध अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. एका पोस्टमध्ये कंगनाने ममता यांची तुलना रावणाशी केली होती तर दुसऱ्या पोस्टमध्ये कंगनाने त्यांना ताडका राक्षसी म्हटली होती. शिवाय पश्चिम बंगाल येथील हिंसाचारासाठी कंगनाने ममता यांना दोषी म्हटलं होतं. ट्विटर अकाउंट सस्पेन्ड झाल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.