कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:58 IST2026-01-08T09:58:20+5:302026-01-08T09:58:52+5:30
एका ढाबा चालकाच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी जो खुलासा केला, तो ऐकून संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.

AI Generated Image
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील हसनगड गावातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका ढाबा चालकाच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी जो खुलासा केला, तो ऐकून संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. ज्या मुलीला बापाने लहानाचं मोठं केलं, त्याच मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बापाचा निर्घृण खून केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटात मुलीच्या आईचाही सहभाग होता, हे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
मध्यरात्री पाडला रक्ताचा सडा
मयत गुलाब सिंह (५०) हे हसनगड गावाजवळ स्वतःचा ढाबा चालवायचे. २८ डिसेंबरच्या रात्री २ वाजता ते काम संपवून दुचाकीने घराकडे परतत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला आणि त्यांची हत्या केली. सुरुवातीला हा अज्ञात हल्लेखोरांचा कट वाटत होता, मात्र पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली, तेव्हा धागेदोरे थेट घरातच पोहोचले.
भाडेकरू प्रियकरासोबत जुळलं सूत
गुलाब सिंह यांनी घराशेजारीच काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या. तिथे उत्तर प्रदेशचा मालोक गौतम ऊर्फ रॉकी हा तरुण राहत होता. याच दरम्यान गुलाब सिंह यांची मुलगी खुशबू आणि रॉकी यांच्यात सूत जुळलं. दोघेही तासनतास फोनवर बोलत असत. एके दिवशी गुलाब सिंह यांनी खुशबूला रॉकीसोबत फोनवर बोलताना पकडलं आणि तिला चांगलंच फैलावर घेतलं. तसेच रॉकीलाही कडक शब्दांत तंबी दिली होती. हीच गोष्ट खुशबूच्या मनात सलत होती.
आईने का दिली साथ?
या हत्येच्या कटात गुलाब सिंह यांची पत्नी रितू हिचाही समावेश होता. पोलिसांनी जेव्हा रितूला बेड्या ठोकल्या, तेव्हा तिने सांगितलं की, पती गुलाब सिंह तिला आणि मुलीला सतत मारहाण करायचा. कौटुंबिक जाच आणि मुलीचं प्रेमप्रकरण या दोन कारणांमुळे माय-लेकीने मिळून गुलाब सिंह यांचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यांनी रॉकीला या हत्येसाठी तयार केलं.
असा उलगडला हत्येचा गुंता
हत्येनंतर रॉकी फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. जेव्हा पोलिसांनी रॉकीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा त्याचे मयताची पत्नी आणि मुलगी या दोघांशीही सतत बोलणं झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी तातडीने रॉकीला सोनीपत येथून ताब्यात घेतलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी रितू आणि खुशबू या माय-लेकींनाही अटक केली आहे. सध्या हे तिघेही पोलीस कोठडीत असून, हत्येसाठी वापरलेलं शस्त्र पोलिसांनी जप्त केलं आहे. एका फोन कॉलमुळे सुरू झालेला हा वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.