पत्रकार बाळ बोठे निघाला हत्याकांडाचा सूत्रधार; सुपारी देऊन केली रेखा जरे यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:56+5:302020-12-04T04:50:13+5:30

नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे.

Journalist Bal Bothe Nighala was the mastermind of the murder; Assassination of Rekha Jare by betel nut | पत्रकार बाळ बोठे निघाला हत्याकांडाचा सूत्रधार; सुपारी देऊन केली रेखा जरे यांची हत्या

पत्रकार बाळ बोठे निघाला हत्याकांडाचा सूत्रधार; सुपारी देऊन केली रेखा जरे यांची हत्या

googlenewsNext

अहमदनगर : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार दैनिक ‘सकाळ’च्या अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी ही बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे अधीक्षकांनी सांगितले. बोठे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. जरे यांची हत्या का करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोठे याच्या अटकेनंतर हत्याकांडाचे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बोठे सध्या फरार आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. मात्र, तो सापडला नाही. 

आरोपींपैकी फिरोज व ज्ञानेश्वर या दोघांनी दुचाकी आडवी लावून जरे यांची कार अडवली व गळा चिरून त्यांची हत्या केली. चोळके याने या दोघांना ही सुपारी दिली होती, तर चोळके याला बोठे व भिंगारदिवे यांनी सुपारी दिल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी भिंगारदिवे याच्याकडून ६ लाख २० हजार रुपये जप्त केले आहेत. 

घटनेनंतर बोठे याने केली दिशाभूल

रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नगरच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. त्यावेळी बाळ बोठे बराच काळ स्वत: जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता. जरे यांचा लहान मुलगा व त्यांच्या आईचे तो सांत्वन करीत होता. पोलीस जरे यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेत असतानाही बोठे सावलीसारखा तेथेच उपस्थित होता. तो प्रत्येक माहितीकडे लक्ष ठेवत होता. तेव्हापासूनच बोठे याच्याबद्दल शंका निर्माण झाली होती.

बोठेविरोधात सक्षम पुरावे

जरे हत्याकांडात बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे सक्षम पुरावे असून, त्याच्या अटकेनंतर यात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एका दैनिकाचा संपादकच हत्येचा सूत्रधार निघाल्याने पोलीसही चक्रावून गेेले आहेत. अटकेत असलेल्या भिंगारदिवे याने या हत्याकांडामागील सर्व कारणे बोठे यालाच माहीत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे, अशीही माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

क्राइम रिपोर्टर ते खुनाचा सूत्रधार 

बोठे हा पूर्वी स्वत: क्राइम रिपोर्टर होता. वकिलीच्या पदवीसोबतच त्याने पीएच.डी. मिळविलेली आहे. पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही त्याची नियुक्ती आहे. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तो समाजात वावरत होता. मात्र, आता तो खुनाचा मास्टरमाइंड म्हणून समोर आला आहे.

Web Title: Journalist Bal Bothe Nighala was the mastermind of the murder; Assassination of Rekha Jare by betel nut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून