Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:30 IST2020-04-08T12:30:20+5:302020-04-08T14:30:57+5:30
Jitendra awhad News : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आव्हाड यांच्यासमोर झालेल्या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे.

Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ
मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड एका मारहाणीच्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्याने आपल्याला त्यांच्या समक्ष मारहाण करण्यात आल्याचा आरोप ठाण्यातील एक तरुणाने केला होता. दरम्यान, आज एका तरुणाने जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार अशी धमकी फेसबुकवरून दिल्याने खळबळ उडाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर आपल्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप ठाण्यातील एका इंजिनिअर तरुणाने केला होता. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या मारहाण प्रकरणावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचदरम्यान एका तरुणाने फेसबुकवरील एका पोस्टखाली प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार' अशा शब्दांत धमकी दिली आहे.
दरम्यान, ठाण्यातील त्या तरुणाला झालेल्या मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आव्हाड यांच्या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ठाण्यातील संबंधित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.