जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:07 IST2026-01-12T11:06:34+5:302026-01-12T11:07:41+5:30
जमिनीचे पैसे मिळाल्यानंतर एका तरुणाची पत्नी पैसे आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळाली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीचे पैसे मिळाल्यानंतर एका तरुणाची पत्नी पैसे आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळाली आहे. पीडित पतीने आपल्या पत्नीवर केवळ फसवणुकीचाच नव्हे, तर घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरल्याचा गंभीर आरोपही केला आहे. चंदन अहिरवार असं या तरुणाचं नाव आहे.
चंदनने सांगितलं की, त्याचे वडील ग्यासी अहिरवार यांची जमीन 'बीड़ा' (BIDA) योजनेअंतर्गत अधिग्रहित करण्यात आली होती. त्या बदल्यात त्यांना सरकारकडून मोबदला मिळाला होता. ग्यासी अहिरवार यांनी ही रक्कम आपली तीन मुले - जगत, अर्जुन आणि चंदन यांच्यात प्रत्येकी ८-८ लाख रुपये याप्रमाणे समान वाटली होती. चंदनच्या म्हणण्यानुसार, तो या पैशातून नवीन घर बांधण्याचं आणि कुटुंबाच्या भविष्याचे नियोजन करत होता.
चंदनने पुढे सांगितलं की, त्याचे लग्न पाच वर्षांपूर्वी प्रेमनगर येथील रहिवासी रेशमा अहिरवार हिच्याशी झाले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. चंदनचा आरोप आहे की, लग्नानंतर काही काळातच रेशमाचे शेजारी राहणाऱ्या अभिषेक अहिरवार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यावरून घरात दररोज वाद होत असत.
चंदनच्या सांगण्यानुसार, ४-५ दिवसांपूर्वी त्याने पत्नीला अभिषेकशी मोबाईलवर बोलताना रंगेहाथ पकडलं होतं, ज्यावरून मोठा वाद झाला होता. दरम्यान, ५ जानेवारी रोजी हा वाद इतका वाढला की, रेशमाने चंदनवर उकळता चहा फेकला, ज्यामध्ये तो होरपळला. दुसऱ्या दिवशी रेशमाने चंदनला सांगितलं की, तिच्या आई-वडिलांनी गावात 'भंडारा' (महाप्रसाद) आयोजित केला आहे, त्यासाठी तिला तिथे जायचे आहे आणि ती मकर संक्रांतीला परत येईल.
विश्वास ठेवून चंदन तिला प्रेमनगरच्या नया गावात सोडून आला. मात्र, ९ जानेवारीला भंडाऱ्याच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य मंदिरात गेले असताना, रेशमाने प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून जाण्यास नकार दिला. याच संधीचा फायदा घेत ती आपल्या मुलीला सोबत घेऊन शेजारी राहणाऱ्या अभिषेक अहिरवारसोबत पळून गेली. नंतर जेव्हा चंदनने पत्नीच्या भावाकडून माहिती घेतली, तेव्हा त्याला एका संशयास्पद नंबरची माहिती मिळाली.
तपास केला असता तो नंबर अभिषेक अहिरवारचा असल्याचे निष्पन्न झाले. चंदन जेव्हा घरी पोहोचला आणि त्याने तपासणी केली, तेव्हा घर बांधण्यासाठी ठेवलेले ५० हजार रुपये रोख आणि मोबदल्याच्या पैशातून खरेदी केलेले सुमारे ५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे आढळले. चंदनने आपल्या सासरच्या लोकांशी संपर्क साधला, परंतु त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.