AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:44 IST2025-12-26T11:44:02+5:302025-12-26T11:44:50+5:30
AI मुळे नोकरी गेल्याने उद्भवलेली आर्थिक चणचण आणि चैनीचे खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

फोटो - आजतक
इंदूरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या सिलिकॉन सिटीमध्ये झालेल्या १५ लाख रुपयांच्या खळबळजनक चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी एका प्रेमी युगुलाला अटक करण्यात आली आहे. 'बंटी-बबली' चित्रपटातून प्रेरणा घेऊन या चोरीचा कट रचणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार नसून सुशिक्षित तरुण आहेत. AI मुळे नोकरी गेल्याने उद्भवलेली आर्थिक चणचण आणि चैनीचे खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
प्रियांशु आणि अंजना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून ते मूळचे मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. डीसीपी झोन-१ कृष्ण लालचंदानी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, आरोपी प्रियांशु इंदूरमधील टिसीएस कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत होता. मात्र AI मुळे झालेल्या कपातीमध्ये त्याची नोकरी गेली. दुसरीकडे अंजना इंदूरमध्ये राहून 'नीट' परीक्षेची तयारी करत आहे. नोकरी गेल्याने आलेली आर्थिक ओढताण आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोघांनी मिळून चोरीची योजना आखली.
अशी केली चोरीची तयारी
डीसीपी लालचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी सहावीपासून एकत्र शिकत आहेत. चोरी करण्यापूर्वी त्यांनी सुमारे एक आठवडा सिलिकॉन सिटीमधील 'श्री ज्वेलर्स' या दुकानाची रेकी केली. दुकानाची रचना आणि सुरक्षा व्यवस्था समजून घेण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी तिथून काही वस्तूही खरेदी केल्या होत्या.
प्रियांशु आणि अंजना यांनी रेकी करण्यासाठी त्यांच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या एका जोडप्याच्या स्कूटरचा वापर केला होता. पोलिसांना या स्कूटरच्या माध्यमातूनच महत्त्वाचा धागा मिळाला. त्याचा मागोवा घेत पोलीस पथक आरोपींच्या मंडला येथील घरापर्यंत पोहोचले.
ख्रिसमस साजरा करायला जाताना अटक
आरोपींनी दुकानातून सुमारे १५ लाख रुपयांचे दागिने चोरले होते. ते हे दागिने इंदूरच्या सराफा बाजारात विकण्याच्या प्रयत्नात होते, परंतु वय लहान असल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून दागिने खरेदी केले नाहीत. त्यानंतर चोरीचा माल घेऊन दोघेही ख्रिसमस साजरा करण्यासाठी मंडलाला निघाले होते. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे दोघांना भोपाळ रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.