आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:27 IST2025-11-18T12:26:30+5:302025-11-18T12:27:19+5:30
सायबर क्राइम पोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" घोटाळ्यात टीडीपी आमदार पुट्टा सुधाकर यादव यांच्याकडून १.०७ कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खासगी बँकेच्या दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली.

आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
हैदराबाद सायबर क्राइमपोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" घोटाळ्यात टीडीपी आमदार पुट्टा सुधाकर यादव यांच्याकडून १.०७ कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खासगी बँकेच्या दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली आहे. एका आठवड्यापूर्वी या लोकांना अटक करण्यात आली होती, पण आता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये एका गँगने म्यदुकुरचे आमदार आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या बंजारा हिल्स येथील घरी तीन दिवस डिजिटल अरेस्ट करून ठेवलं होतं. मुंबई पोलीस असल्याचं भासवून गँगने त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा मोठा आरोप केला. आमदारची असल्याची माहिती असल्याने फसवणूक करणाऱ्यांनी निवडणुकीचा आणि बेकायदेशीर कृत्यांचा उल्लेख करून त्यांना धमकावलं.
पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं. मात्र त्यानंतर कॉल करणारे गायब झाल्यावर आमदाराने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. बँकिंग ट्रेल्सच्या आधारे, तपासकर्त्यांनी लखनौ, विजयवाडा आणि दिल्ली येथून आठ आरोपींना अटक केली. संशयितांनी तीन शहरांमधील हॉटेलमध्ये फिरून फसवणूक केली. चोरीचे पैसे अद्याप सापडलेले नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.