५ वर्षांचं प्रेम, लग्नानंतर बायकोला शिकवलं, पोलीस अधिकारी बनवलं; आता नवऱ्यावरच केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:53 IST2026-01-08T14:51:35+5:302026-01-08T14:53:03+5:30
पत्नीला शिकवून पोलीस अधिकारी बनवणाऱ्या गुलशन नावाच्या पतीवरच हुंडा मागितल्याचा आणि छळ केल्याचा एफआयआर दाखल झाला आहे.

फोटो - tv9hindi
उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीला शिकवून पोलीस अधिकारी बनवणाऱ्या गुलशन नावाच्या पतीवरच हुंडा मागितल्याचा आणि छळ केल्याचा एफआयआर दाखल झाला आहे. याप्रकरणी पती गुलशनने हापुडचे पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची विनंती केली आहे. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्नी पायल राणीने तिचा पती गुलशन आणि त्याच्या कुटुंबातील ६ सदस्यांविरुद्ध हापुड नगर कोतवालीमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हापुडच्या गणेशपुरा परिसरातील रहिवासी आणि सध्या बरेली जिल्ह्यात तैनात असलेल्या महिला सब-इन्स्पेक्टर पायल राणीने तक्रार दिली आहे. पायल राणीचं लग्न २ डिसेंबर २०२२ रोजी पिलखुवा येथील गुलशनशी झालं होतं. लग्नाच्या वेळी माहेरच्यांनी पुरेसा हुंडा दिला होता, तरीही सासरचे लोक समाधानी नव्हते. लग्नानंतर पती गुलशन, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांनी १० लाख रुपये रोख आणि एका कारची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.
जीवे मारण्याची धमकी
मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि तिच्यावर एसिड फेकून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली, असा आरोप पायलने केला आहे. पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांच्या आदेशानुसार, सदर कोतवाली पोलिसांनी पायल राणीच्या तक्रारीवरून पती गुलशनसह सहा जणांविरुद्ध हुंडाबळी, मारहाण, धमकी आणि संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
"मी पत्नीला शिकवून अधिकारी बनवलं"
पती गुलशनचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. गुलशनने सांगितलं की, "मी आणि पायल २०१६ पासून एकमेकांच्या प्रेमात होतो. आम्ही एकत्र शिकलो. २०२१ मध्ये आमचा कोर्ट मॅरेज झालं होतं आणि त्यानंतर घरच्यांना पटवून २०२२ मध्ये हिंदू रितीरिवाजाप्रमाणे आमचं लग्न झालं. आमच्या लग्नात कोणताही हुंडा घेतला नव्हता. मी माझ्या कष्टाच्या पैशातून पायलला शिकवलं आणि तिला सब-इन्स्पेक्टर बनवण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. पण आता नोकरी लागताच तिने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केला आहे." गुलशनने एसपींकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणाचे पूर्ण सत्य पोलीस तपासानंतरच समोर येईल.